सर्व पित्री अमावास्या १० रोजी

Foto

३० रोजी चतुर्थी श्राद्ध व पंचमी श्राद्ध एकाच दिवशी
यंदा १४ दिवसांचा राहील पक्ष पंधरवडा
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष हा पितृपक्षाचा पंधरवडा म्हणून ओळखला जातो. यावर्षी २७ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान १४ दिवसांचा पितृपक्ष आहे, अशी माहिती ज्योतिषाचार्य पं. ऋषिकेश रविंद्र
चौधरी यांनी दिली.
३० सप्टेंबर रोजी चतुर्थी श्राद्ध व पंचमी श्राद्ध एकाच दिवशी आहे. त्यामुळे १४ दिवसांचा पक्ष पंधरवडा झाला आहे. पितृपक्षातील श्राद्धाला महालय श्राद्ध सुद्धा म्हणतात. पौर्णिमेचे महालय श्राद्ध हे २९ सप्टेंबर, २, ३, ७, १० ऑक्टोंबर यापैकी कोणत्याही एका दिवशी करावे. तर भरणी श्राद्ध २९ सप्टेंबर रोजी, अविधवा नवमी ४ ऑक्टोंबर रोजी तर संन्यासिनांचे महालय श्राद्ध ७ ऑक्टोंबर द्वादशीच्या दिवशी करावे. तसेच शस्त्रादिहद श्राद्ध (ज्यांचा शस्त्राने घात झाला त्यांचे श्राद्ध) ९ ऑक्टोबर चतुर्दशी तिथीला करावे. सर्व पित्री अमावस्या १० ऑक्टोंबर रोजी असेल.
पंधरवड्यातील श्राद्ध तिथी
२७ सप्टेंबर रोजी प्रतिपदा श्राद्ध तर २८ सप्टेंबर रोजी द्वितीया श्राद्ध, २९ सप्टेंबरला तृतीया श्राद्ध, भरणी श्राद्ध, ३० सप्टेंबरला चतुर्थी व पंचमी श्राद्ध, १ ऑक्टोंबर षष्ठी श्राद्ध, २ ऑक्टोंबर रोजी सप्तमी श्राद्ध, ३ ऑक्टोंबर रोजी अष्टमी श्राद्ध, ४ ऑक्टोंबर रोजी नवमी श्राद्ध, ५ ऑक्टोंबर रोजी दशमी श्राद्ध, ६ ऑक्टोंबर रोजी एकादशी श्राद्ध, ७ ऑक्टोंबर रोजी द्वादशी श्राद्ध, ८ ऑक्टोंबर रोजी त्रयोदशी श्राद्ध, ९ ऑक्टोंबर रोजी चतुर्दशी श्राद्ध, १० ऑक्टोंबर रोजी अमावस्या श्राद्ध असेल. घरातील काही अडचणींमुळे ज्याना पितृपक्षात श्राद्ध करता आले नाही त्यांना पितृपक्षातील महालयश्राद्ध १५ नोव्हेंबरपर्यंत करता येते, असेही ज्योतिषाचार्य पं. ऋषिकेश रविंद्र चौधरी यांनी स्पष्ट केले.