महाराष्ट्रात पुन्हा धो-धो पाऊस बसरणार, विदर्भ, मराठवाड्यात चार दिवस मोठ्या पावसाची शक्यता

Foto
मुंबई :  मान्सूनने पश्चिम राजस्थानच्या काही भागांतून माघार घेण्यास सुरुवात केली आहे. आगामी ३ ते ४ दिवसांत राजस्थान, पंजाब आणि सौराष्ट्र-कच्छच्या काही भागांतून मान्सूनच्या परतीचा प्रवास वेगाने सुरू होण्यासाठी हवामान अनुकूल आहे. मात्र, दुसरीकडे बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता पुन्हा वाढली आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचा थेट फायदा विदर्भ आणि मराठवाड्याला मिळणार असून, या भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच, येत्या २३ सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस हजेरी लावेल, असा इशारा देण्यात आला आहे.
 
मान्सूनचा परतीचा प्रवास राजस्थानमधून सुरू
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मान्सूनने दोन दिवस उशिरा म्हणजेच १९ सप्टेंबर रोजी राजस्थानच्या काही भागांतून माघार घेतली. साधारणपणे मान्सूनचा परतीचा प्रवास १७ सप्टेंबर रोजी सुरू होतो.  उत्तर अंदमान समुद्र आणि परिसरातील वार्‍यांच्या चक्राकार स्थितीमुळे त्याच भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. हा कमी दाबाचा पट्टा हळूहळू तीव्र होऊन पश्चिम-वायव्य दिशेने सरकत जाऊन पुढील ३-४ दिवसांत दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकण्याचा अंदाज आहे.

बंगालच्या उपसागरात हवामानातील बदलामुळे महाराष्ट्रात पावसाचे पुनरागमन होत आहे. येत्या २० ते २५ सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्र आणि गोवा परिसरामध्ये पावसात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना दिलासा मिळणार असून, अंतर्गत भागातही पावसाचा जोर वाढणार आहे, असे ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले आहे. तर येत्या १९ ते २२ सप्टेंबरदरम्यान सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांत मध्यम मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ते २१ सप्टेंबरला नाशिकमध्येही मध्यम पाऊस पडेल. अहिल्यानगर, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत मध्यम पावसाची शक्यता आहे. २२ सप्टेंबरला मराठवाड्यातही पाऊस राहील.

२१ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या कालावधीत महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहेत. हा मान्सूनच्या हंगामाचा शेवटचा टप्पा असून, या पावसामुळे कोरड्या हवामानातून दिलासा मिळू शकतो. बळीराजाला यामुळे काहीसा दिलासा मिळणार आहे.