छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो): समाजकल्याण विभागाच्या वतीने व्हिजेएनटी, ओबीसी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणार्या शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयाकडे प्रलंबित आहेत. अद्यापही १४ हजार ३१ शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयांकडेच प्रलंबित आहेत. त्यांना समाजकल्याण विभागाकडे ३१ जानेवारीपर्यत मुदत देण्यात आली आहे. मुदतीत शिष्यवृत्ती अर्ज समाजकल्याण विभागाला पाठविले नाहीतर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहेत.
समाजकल्याण विभागाच्या वतीने व्हीजेएनटी, ओबीसी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी देण्यात येत असलेल्या शिष्यवृत्तीचे अर्ज मोठ्या प्रमाणावर भरले आहेत. मात्र काही महाविद्यालयांकडेच शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित असल्याने समाजकल्याण विभागावर प्रतिक्षा करण्याची वेळ आली आहे. जवळपास १४ हजार ३१ शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयांनी समाजकल्याण विभागाकडे पाठविले नाही. मुदत जवळ येऊनही महाविद्यालयांकडील अर्जांची छाननी व पुढील कार्यवाही पूर्ण न झाल्याने शिष्यवृत्ती वितरणावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. व्हिजेएनटी, ओबीसी आणि एसबीसी या तिन्ही प्रवर्गांतून एकूण ३९ हजार २७ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज भरले आहेत. त्यापैकी २३ हजार १०६ अर्ज महाविद्यालयांनी समाजकल्याण विभागाकडे पाठविले आहेत. मात्र अद्यापही १४ हजार ३१ अर्ज महाविद्यालयांकडेच प्रलंबित आहेत. त्यामुळे समाजकल्याण विभागाला प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. ३१ जानेवारीपर्यत मुदत देण्यात आली आहे. या दिलेल्या मुदतीत महाविद्यालयांनी शिष्यवृत्ती अर्ज समाजकल्याण विभागाकडे पाठविले नाहीतर महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात येणार असल्याचे समाजकल्याण विभागाने स्पष्ट केले आहे.
प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज समाजकल्याण विभागाकडे पाठवावे
दरवर्षीप्रमाणे यंदाही शिष्यवृत्ती अर्ज भरणे प्रकिया राबविण्यात येत आहेत. त्यात मोठ्या प्रमाणावर शिष्यवृत्ती अर्ज विद्यार्थ्यांनी भरले आहेत. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज भरले परंतु काही महाविद्यालयांनी अजूनही समाजकल्याण विभागाकडे शिष्यवृत्ती अर्ज पाठविले नाहीत. त्यामुळे शिष्यवृत्ती द्यायची कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. समाजकल्याण विभागालाही शिष्यवृत्ती अर्जाची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे.३१ जानेवारीपर्यत शिष्यवृत्ती अर्ज समाजकल्याण विभागाकडे पाठवावेत असे आवाहन समाजकल्याण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.















