दुसऱ्या पत्नीचा जाच; वृद्धाने केली रेल्वेखाली आत्महत्या

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): निवृत्तीनंतर मिळालेले पैसे आणि जमिनीसाठी दुसरी पत्नी, तिचा भाऊ आणि इतर नातेवाईकांनी लावलेल्या सततच्या तगाद्याला कंटाळून एका ६२ वर्षीय वृद्धाने धावत्या रेल्वेखाली उडी मारून जीवनयात्रा संपवली. भाऊसाहेब रायभान पठाडे (वय ६२, रा. देवगिरी वृंदावन सोसायटी, देवळाई रोड) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही धक्कादायक घटना चिकलठाणा रेल्वे ट्रॅक परिसरात घडली.
याप्रकरणी त्यांचा मुलगा राहुल भाऊसाहेब पठाडे (२५, रा. जाधववाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भाऊसाहेब बजाज कंपनीतून २०२२ मध्ये निवृत्त झाले होते. त्यांना मिळालेल्या २५ लाख रुपयापैकी १५ लाख रुपये त्यांनी त्यांची दुसरी पत्नी (सावत्र आई) कल्पना हिला दिले होते. कल्पना आणि तिचा भाऊ नवनाथ हे सतत पैशांची मागणी करत होते. घर आणि शेती नावावर करण्यासाठी ते
भाऊसाहेबांचा मानसिक छळ करत होते. सततच्या वादामुळे मुलगा वेगळा राहत होता. त्यांच्या खिशात सुसाईड नोट सापडली. यात पत्नीने १० लाख ४२ हजार व तिच्या भावाला बुलेट गाडी घेतली. मला जमीन घेऊन देते म्हणून धोका दिला असे लिहिलेले होते. तळेकर, कासोळे, शिंदे यांचे नावही नमूद आहे. पुढील तपास उपनिरीक्षक नंदकुमार लाटे करत आहेत.
मुलाला शेवटचा फोन
भाऊसाहेब १६ मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास घरातून निघून गेले. दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांनी मुलगा राहुलला फोन केला आणि तुझी सावत्र आई आणि तिचा भाऊ यांच्या त्रासाला कंटाळून मी माझा जीव देत आहे, असे सांगून फोन कट केला. राहुलने त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास चिकलठाणा रेल्वे रुळावर भाऊसाहेब यांचा मृतदेह आढळला.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions