छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिस दलात निवड, गंगापूरमध्ये उत्स्फूर्त सत्कार

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी): शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात राहणाऱ्या अत्यंत साध्या व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील पायल मनिषा राजू बनसोडे हिने आपल्या जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर मोठे यश संपादन करत छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिस दलात खुल्या प्रवर्गातून निवड झाली.

 तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गंगापूर शहरात तिचा उत्स्फूर्त सत्कार करण्यात आला. तिच्या यशामुळे परिसरात अभिमानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पायलच्या या यशामागे तिच्या कुटुंबाची मोठी साथ असून विशेषतः वडील राजू बनसोडे यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत मुलींच्या शिक्षणासाठी संघर्ष केला. अनेक आर्थिक अडचणी, सामाजिक अडथळे आणि संकटांचा सामना करत त्यांनी आपल्या मुलींच्या स्वप्नांना पाठबळ दिले.

 त्यांच्या या जिद्दी आणि त्यागाचेच हे फळ असल्याचे उपस्थितांनी यावेळी नमूद केले. सत्कार समारंभात धन्वंतरी अॅक्युपंक्चर केंद्राचे डॉ. सुनिल उबाळे, सामाजिक कार्यकर्ते अरुण वाकडे, वडील राजू बनसोडे, आई, बहिण सोनाली उबाळे, दाजी आकाश उबाळे व भाऊ लखन बन्सोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.