अमळनेर : सेल्फी घेताना पाय घसरल्यानं एकजण बुडू लागल्याने त्याला वाचवताना इतर दोन मुलांचाही मृत्यू झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे काल मंगळवारी सायंकाळी पावणेपाच वाजता घडली. प्राथमिक माहितीनुसार, मानव बंटी रतनानी (वय १४), कार्तिक विकी उधवानी (वय १४) व दिनेश विजय पंजवानी (वय १७, तिघं रा. सिंधी कॉलनी, अमळनेर) अशी मृत मुलांची नावे आहेत.
हे तिघं काल मंगळवारी सायंकाळी पावणेपाच वाजता खाण परिसरात गेले होते. तेथे बेटासारखा उंचवटा असल्याने तिघे पाण्यातून चालत त्यावर चढले. सेल्फी काढताना एकाचा पाय घसरला. त्याला वाचविण्यासाठी दुसर्याने त्याचा हात धरला; मात्र, तोही खाली जाऊ लागला, म्हणून त्याने तिसर्याचा हात धरला. मात्र, तिघेही ३० फूट खोल पाण्यात बुडाले. ही घटना एका रिक्षावाल्याच्या नजरेस पडली. तो धावत खाणीजवळ पोहचला तोपर्यंत एकाने ११२ डायल करून पोलिसांना माहिती दिली.
स्थानिक नागरिक आणि पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, नायब तहसीलदार सी. यू. पाटील यांच्यासह इतर घटनास्थळी पोहचले. मोठ्या प्रयत्नांनंतर देवळी येथील दीपक मोरे याने पाण्यात उडी मारून तिन्ही मुलांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत तिघांचा मृत्यू झाला होता. तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अमळनेरच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. दिनेश हा अकरावी कॉमर्सला, तर मानव आणि कार्तिक नववीत शिकत होते. घटनेमुळे सिंधी कॉलनीत शोककळा पसरली होती.