वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Foto
मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील  आरोपी वाल्मिक कराडचा बीडच्या तुरुंगात आहे. दरम्यान तुरुंगातही त्याचा पाहुणचार सुरू असल्याची ओरड सातत्याने होत असते. बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील पोलिसांकडून त्याचा आणि आरोपींचा बडेजाव केला जातो, त्यांना आवश्यक ती सुविधा पुरवली जात असल्याचा आरोपही दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे. आता, याच आरोपावरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळेंनी ट्विट करुन मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. त्यामध्ये, आरोपी वाल्मिक कराडची नागपूर कारागृहात रवानगी करावी, असे त्यांनी म्हटलं आहे.

मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला बीड जिल्हा कारागृहात राजकीय प्रभावामुळे बेकायदेशीर सुविधा दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी कारागृह अधीक्षक यांना लिहिलेल्या पत्राद्वारे केला आहे, अशी माहिती देत खासदार सुप्रिया सुळे यांनी बीडमधील आरोपी वाल्मिक कराड यास बीडमधून नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात हलवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

धनंजय देशमुख यांनी कारागृह अधीक्षकांना लिहिलेल्या पत्रानुसार, यामध्ये इतर कैद्यांच्या नावावरून आणि वकिलांच्या सिमकार्डद्वारे बाहेरील व्यक्तींशी संपर्क साधणे, दुपारच्या बंदीच्या काळात अधीक्षक कार्यालयात बसवून नियमबाह्य पद्धतीने व्हिडिओ कॉल सुविधा पुरविणे, बराक क्र. 9 जवळील फोनजवळ सीसीटीव्ही कॅमेरा नसणे आणि कारागृहातूनच बीडमधील परिस्थितीवर प्रभाव टाकून इतर आरोपींच्या मदतीने दहशत निर्माण करणे आदी मुद्दे नमूद आहेत, अशी माहितीही सुप्रिया सुळे यांनी दिली.

वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात हलवावे 
बीडमधील कारागृहात घडत असलेला हा प्रकार न्यायप्रक्रियेचा थेट अपमान असून माझी मुख्यमंत्र्यांना मागणी आहे की, कृपया सदर आरोपीची बीड कारागृहातून नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करावी. बीड कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज, कॉल लॉग आणि भेट नोंदवही जप्त करून वरिष्ठ स्तरावर चौकशी व्हावी. आरोपीला मदत करणाऱ्या संबंधित कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत. पीडित देशमुख कुटुंबाला न्याय मिळणे याला आमचे प्राधान्य असून आम्ही यासाठी आग्रही आहोत, असेही सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरुन म्हटले आहे.