गंगापूर, (प्रतिनिधी) : तालुका विधी सेवा समिती, गंगापूर यांच्या वतीने पोलिस ठाणे, गंगापूर येथे कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ज्येष्ठ नागरिकांचे हक्क, त्यांचे संरक्षण तसेच समाजातील प्रत्येकाने ज्येष्ठ नागरिकांची सेवा व सन्मान करावा, असे आवाहन न्यायाधीश ए. ए. कळमकर यांनी केले.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली कॉमन मिनिमम प्रोग्रॅम २०२६ अंतर्गत जून महिन्यातील कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ए. ए. कळमकर, २ रे सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर), गंगापूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी तालुका विधी सेवा समितीचे उपाध्यक्ष तथा तहसीलदार, पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश पालवे, पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड, गोपनी शाखा चे मनोज यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिबिरात ज्येष्ठ नागरिकांचे कायदेशीर हक्क, त्यांच्यावरील अत्याचार प्रतिबंधक उपाय, पालक व ज्येष्ठ नागरिक भरणपोषण कायदा, मोफत विधी सेवा योजना तसेच नागरिकांनी कायद्याचे पालन करून सामाजिक बांधिलकी जपण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सूत्रसंचालन अॅड. ए. एस. बर्वे यांनी केले. यावेळी अॅड. ए. बी. कुलकर्णी, अॅड. व्ही. बी. वाघचौरे, अॅड. ए. एस. वैष्णव तसेच सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड. व्ही. एस. काळे, कावेरी पावणे पाटील, यांनी विविध कायदेविषयक विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिबिरास पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांबाबत जनजागृती करण्यात आली.













