गोदावरी नदीत बुडून सतरा वर्षीय युवकाचा मृत्यू

Foto
पैठण, (प्रतिनिधी): गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी गेलेल्या एका सतरा वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली आहे. सध्या अधिक महिना चालू असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून दररोज हजारो भाविक नाथ समाधीचे दर्शन घेण्यासाठी पैठण मध्ये येत आहेत. 

त्या पुर्वी भाविक गोदावरी नदीत स्नान करून नाथ समाधीचे दर्शन घेतात. शनिवारी रोजी शेणपुंजी रांजणगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथील अधिराज रमेश शिंदे हा सतरा वर्षीय युवक आपल्या नातेवाईकासह नाथ समाधीचे दर्शन घेण्यासाठी पैठण येथे आला होता. नाथ समाधीचे दर्शन घेण्याअगोदर तो नाथ घाटाच्या समोरील गोदावरी नदीच्या पात्रात स्नान करण्यासाठी उतरला. 

परंतु त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. त्याला येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. वैद्यकीय अधिकारी यांनी पोलिसांना दिलेल्या एमएलसीच्या अनुषंगाने पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या आदेशाने पोलीस हेड कॉन्स्टेबल जिवडे हे करीत आहे.