बोलठाण उत्तर वाडीत तीव्र पाणीटंचाई; टँकर सुरू न केल्यास उपोषणाचा इशारा

Foto
गंगापूर (प्रतिनिधी)  
गंगापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत तांदूळवाडी अंतर्गत येणाऱ्या बोलठाण उत्तर वाडी परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर त्वरित पाणीटँकर सुरू करण्यात यावा, अन्यथा गटविकास अधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

याबाबत बोलठाण येथील हारुण सांडू पठाण यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, बोलठाण, उत्तर वाडी आणि तांदूळवाडी या गावांमध्ये जलसाठे पूर्णपणे आटले असून काही ठिकाणी अत्यल्प पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे महिलांसह वयोवृद्धांना लांब अंतरावरून पाणी आणावे लागत असून ग्रामस्थांचे हाल होत आहेत.

दरम्यान, ३० मार्च रोजीच ग्रुप ग्रामपंचायत तांदूळवाडीच्या वतीने पाणीटँकर सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. जर येत्या आठ दिवसांत पाणीटँकर सुरू करण्यात आले नाही, तर ग्रामस्थांसह गटविकास अधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करण्यात येईल, असा इशारा हारुण सांडू पठाण यांनी दिला आहे.