मुंबई : यंदा राज्यातील अनेक भागांमध्ये पुरेसा पाऊस न पडल्याने दुष्काळाचे संकट उभे ठाकले आहे. ही परिस्थिती ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना आपापल्या भागातील दुष्काळी परिसरात जाऊन आढावा घेण्याचे आदेश दिले होते. आगामी काळात दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारी यंत्रणांकडून वेगाने उपाययोजना राबवल्या जातील, यादृष्टीने चाचपणी सुरु आहे. अशातच आता राजकारणाचा आणि आपातकालीन परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणा हाताळण्याचा प्रचंड अनुभव असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे.
शरद पवार हे राज्यातील दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. २८ सप्टेंबरला शरद पवार हे दुष्काळी भागाचा दौरा करतील. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. दुष्काळग्रस्त शेतकर्यांना हेक्टरी ५० हजार रुपये ही मदत सुधा जाहीर करावी, अशी मागणी या पत्रात शरद पवार यांनी केली होती. त्यानंतर आता शरद पवार प्रत्यक्ष जमिनीवर उतरुन आणि शेतकर्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. या दौर्यात शरद पवार काय निरीक्षणे नोंदवणार आणि त्यानंतर सरकारकडे काय मागण्या करणार, हे पाहावे लागेल. तत्पूर्वी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे रविवारपासून शेतात राज्यातील दुष्काळी भागातील दौरा करत आहेत. रोहित पवार हे राज्य सरकारवर सातत्याने टीकेची तोफ डागत आहेत. त्यानंतर आता शरद पवार दुष्काळी दौरा केल्यानंतर काय बोलणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
२८ सप्टेंबरला मुंबईत राज्यस्तरीय बैठक
एकीकडे शरद पवार दुष्काळी भागाचा दौरा करताना त्यांच्या पक्षाकडून मुंबईत राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दुष्काळ, बेरोजगारी, पेपर फुटी आणि वर बैठकीत मंथन होणार आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडेल. वाय बी चव्हाण सेंटर येथे सकाळी १० वाजता बैठक पार पडणार आहे. बैठकीला सर्व खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी, निरीक्षक, प्रवक्ते, सर्व जिल्हाध्यक्ष कार्याध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, माजी खासदार, आमदार, लोकसभा विधानसभा उमेदवार, फ्रँटल अध्यक्ष व सेलचे राज्यप्रमुख यांना निमंत्रण देण्यात आले आहे.