गंगापूर, (प्रतिनिधी) शहापूर येथील छोटा हत्ती चालकावर अज्ञात मारेकऱ्यांनी हल्ला केला. त्याच्या गुप्तांगावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे.
तालुक्यातील शिंदेवाडी फाटा परिसरात घडलेल्या अत्यंत धक्कादायक आणि अमानुष हल्ल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिताराम आसाराम आळंजकर (वय ३२, रा. शहापूर) हे छोटा हत्ती वाहनाने गंगापूरहून शहापूरकडे जात होते. शनिवारी सायंकाळी सुमारे ७.४५ वाजण्याच्या सुमारास शिंदेवाडी फाटा येथे काही अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली. त्यानंतर आरोपींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने बेदम हल्ला केला.
हल्लेखोरांनी आळंजकर यांना रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात ओढून नेत त्यांच्या डोक्यावर, हातावर आणि विशेषतः गुप्तांगावर वार केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात त्यांच्या गुप्तांगावर गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे व अनिकेत मुळक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
तेथील डॉ. विशाल सूर्यवंशी यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवले आहे. दरम्यान, या घटनेबाबत अद्याप अधिकृत तक्रार दाखल झालेली नसली तरी उपजिल्हा रुग्णालयाकडून एमएलसी अहवाल गंगापूर पोलीस ठाण्यात पाठवला आहे. त्यामुळे पोलिसांकडून पुढील तपास सुरू होण्याची शक्यता आहे.










