मुख्यमंत्री फडणवीस करताहेत फोडाफोडीचे राजकारण -शरद पवार यांचा आरोप ; राष्ट्रवादीच्या नेत्यांवर पक्षांतरासाठी ईडी, सीबीआयकडून कारवाईच्या धमक्या

Foto
पुणे: महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारकडून सत्तेचा गैरवापर केला जात असून, राष्ट्रवादीसह विरोधी पक्षातील नेत्यांना पक्षांतर करण्यासाठी ईडी व सीबीआयसारख्या तपास यंत्रणांचा वापर करून धमकावले जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोडाफोडीचे राजकारण करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केला.

 आज शरद पवार यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेवर घणाघाती टीका केली. राष्ट्रवादीतून भाजप व शिवसेनेत होत असलेल्या आऊटगोईंगवर पवार यांनी यावेळी भाष्य केले. तपास यंत्रणांचा धाक दाखवून सत्ताधारी इतर पक्षांमधील नेत्यांना सत्तांतरासाठी धमकावत आहेत. विरोधी पक्षातील आमदारांना ईडीच्या कारवाईची धमकी दिली जात आहे. हे सूड आणि दबावाचे राजकारण लोकशाहीसाठी घातक आहेे. सत्ताधार्‍यांनी काही नेत्यांना केवळ धमकावण्याच्या कामाची जबाबदारी दिलेली आहे. हे सत्ताधारी इतरांना धमकावण्याचे काम करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: आमदारांना पक्षांतरासाठी फोन करत असल्याचा थेट आरोपही पवार यांनी केला.

सरकार राज्य सहकारी बँकेद्वारे राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपमध्ये येण्यासाठी दबाव टाकत असल्याने ते पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. मोठ्या नेत्यांच्या सहकारी संस्थांना मदत करण्याच्या नावाखाली भाजप त्यांना आपल्या पक्षात घेऊन निवडणूक लढवण्यासाठी दबाव टाकत आहे. हसन मुश्रीफ यांनी भाजपमध्ये येण्यास नकार देताच प्राप्‍तीकर विभागामार्फत त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या पतीची सत्ताधारी पक्षाने एसीबी चौकशी लावली आहे. त्यामुळे त्यांनी भीतीपोटी राजीनामा दिल्याचे पवारांनी स्पष्ट केले. सोलापूरचे कल्याणराव काळे यांचा कारखाना अडचणीत सापडल्यानंतर सरकारने नियम मोडून त्यांना 30-35 कोटी रुपये दिले. त्यामुळे त्यांना भाजपमध्ये जावे लागले. राजकारणात हे चित्र यापूर्वी महाराष्ट्रात नव्हते. सरकार दबाव आणि सुडाचे राजकारण करत आहे. या सर्व गोष्टींचा मी निषेध करतो आणि याला तोंड देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. मला हे काही नवीन नाही. अशावेळी नव्या पिढीला सोबत घेऊन काम करायचे असतेे. पक्षातून गेले त्याबद्दल काही चिंता वाटत नाही. त्यांना उत्तर कसे द्यायचे हे आम्हाला चांगले माहीत आहे, असे शरद पवारांनी सांगितले.
छगन भुजबळ यांच्यावर झोपडपट्टीच्या जागेवर टीडीआर देऊन त्याऐवजी महाराष्ट्र सदन बांधून घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. भुजबळ यांनी दिल्‍लीत चांगले महाराष्ट्र सदन बांधले आहे. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षही त्याच महाराष्ट्र सदनात बैठका घेतात. एवढे उत्तम महाराष्ट्र सदन बांधलेल्या छगन भुजबळांनाही या सरकारने तुरुंगात टाकले, अशी टीका करून पवार म्हणाले, देशात पहिल्यांदाच राजकारणासाठी सत्तेचा गैरवापर केला जात आहे. कर्नाटकनंतर भाजपकडून राजस्थान व मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कर्नाटकातील बंडखोर आमदारांना व मंत्र्यांना मुंबईत जी वागणूक दिली गेली, ती पाहता राज्यात कायदा आहे का नाही, असा प्रश्‍न पडला आहे.

संग्राम जगताप, शिवेंद्रराजे भोसले पक्ष सोडणार नाहीत
 सातार्‍याचे आमदार शिवेंद्र राजे भोसले काल मला भेटले होते. त्यांनी पक्ष सोडून जाणार नसल्याचे सांगितले आहे. श्रीगोंद्याचे आ.राहुल जगताप व नगरचे आ.संग्राम जगताप यांचेसुद्धा फोन आले होते. त्यांनीसुद्धा आम्ही पक्षासोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. बार्शीचे आ.दिलीप सोपल हे काल माझ्यासोबतच होते, तर माढ्याचे आ. बबनदादा शिंदे मला भेटायला येणार आहेत, असा खुलासा पवार यांनी यावेळी केला. आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार असून, विधानसभा निवडणुकीत तरुणांना अधिक संधी दिली जाणार आहे. आम्ही नव्याने तसेच ताकदीने पुन्हा पक्ष उभा करू. 6 आमदारांचे 60 आमदार आम्ही केले होते. आतादेखील त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते, असेही पवार म्हणाले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker