मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याधीही महाराष्ट्राच्या दुष्काळ दौऱ्यावर असताना शरद पवार यांची तब्येत बिघडली, त्यांना कफ आणि अशक्तपणा जाणवू लागण्यानं त्यांना आधी पुण्यात आणि नंतर मुंबईतील रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर, उपचार घेतल्यानंतर ते पुन्हा आपल्या निवासस्थानी दाखल झाले होते. आज त्यांना पुन्हा एकदा डिहायड्रेशनमुळे रुग्णालयात भरती व्हावे लागले असावे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. त्यानंतर आज पुन्हा एकदा शरद पवारांना भेटायला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार प्रफुल पटेल ब्रीच कैंडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. शरद पवारांना आज सकाळच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
काही दिवसांपुर्वी देखील ब्रीच कैंडी रुग्णालयात शरद पवारांवर उपचार सुरू असताना प्रफुल पटेलांनी शरद पवारांची भेट घेतली होती, त्या भेटीनंतरच दोन्ही पक्ष एकत्रित येणार अशा चर्चा रंगल्या होत्या. अशातच आजही पुन्हा एकदा खासदार प्रफुल पटेल ब्रीच कैंडी रुग्णालयात दाखल झाले आहेत, अशी माहिती आहे. (Sharad Pawar Health) तर या भेटीवर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले की, कोणत्याही नेत्यांना जाऊन भेटता येते, कधी कधी इनफेक्शनची भिती असते. सुप्रियाताई तिथे आहेत, इनफेक्शन होईल असं कुठल्याही नेत्यांनी करू नये. आता बारामतीमध्ये त्यांचा दौरा झाला, बैठक मिटींगमुळे वेळेची भान राहत नाही, जेवणाला उशिर होतो, डिहायड्रेशन होते, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी प्रफुल पटेल शरद पवारांच्या भेटीला गेलेत त्यावरती प्रतिक्रिया दिली आहे.
प्रफुल पटेलांची शरद पवारांना भेटल्यानंतर प्रतिक्रिया
शरद पवारांच्या भेटीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना प्रफुल पटेल म्हणाले की, मिडीयाद्वारे समजलं की, शरद पवार साहेब ब्रीच कैंडी रुग्णालयात दाखल झाले आहेत, योगायोगाने माझ्या मुलीच्या सासूबाईंचाही उपचार येथे चालू आहेत, मिडीयामधून समजल्यानंतर स्वाभाविक आहे, अचानक साहेब ब्रीच कैंडी रुग्णालयात का दाखल झाले, इथे मी आलो, पवार साहेबांना देखील मी भेटलो, पुण्यावरून आज सकाळी ते निघाले, प्रवास ते कारने करत होते, त्यांना थोडा दम भरत होता, वहिनीसाहेब देखील सोबत होत्या, त्यांचे पीए देखील सोबत होते, म्हणून घरी जाताना आधी ब्रीच कैंडी रुग्णालयात त्याचे नेहमीचे डॉक्टर येथे असतात, त्यामुळे त्यांनी येथे येवून तपासणी केली, सगळं ठीक आहे, चिंतेचं काही कारण नाही, मी आता गेलो होतो, त्यांना भेटलो, तेव्हा ते जेवत होते, त्यांनी हसत हात केला, त्यामुळं मी काही फार डिस्टर्ब केलं नाही. माहिती घेतली, वहिनींना बोललो, सगळं ठीक आहे, काळजीचं काही कारण नाही, आज बहुतेक ते घरी जातील, किंवा उद्या जातील, तो विषय वेगळा आहे, पण तब्येत चांगली आहे, ते जेवत होते, हसून मला हात केला, मी म्हटलं तुम्ही जेवण करा मी फार डिस्टर्ब करू इच्छित नाही, मी सांगू इच्छितो पवार साहेबांची प्रकृती चांगली आहे, इतकंच, काही काळजीचं कारण नाही, अशी माहिती प्रफुल पटेलांनी दिली आहे.
तर दोन तीन दिवसांपूर्वी शरद पवारांनी बारामती, पुणे दौरा केला होता. आज दुपारी १२ च्या सुमारास रूटीन चेकअपसाठी ते रूग्णालयात दाखल झाले, त्याचवेळी प्रदेश कार्यालयात सुप्रिया सुळेंची बैठक सुरू होती, बैठक सोडून त्या रूग्णालयाकडे गेल्या होत्या, त्यावेळी सुप्रिया सुळेंनी शरद पवारांना डिहायड्रेशन झाल्याची माहिती दिली आहे. शरद पवार यांना बहुधा डिहायड्रेशन (पाण्याचं प्रमाण कमी होणे) झाले असावे, त्यांनी आता थोडा वेग कमी करायला हवा आणि प्रवासही कमी केला पाहिजे. पण, बाबा कोणाचेच ऐकत नाहीत, त्यांना त्यांच्या कामावर खूप जास्त प्रेम आहे. तुमच्या सर्वांच्या काळजीबद्दल आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद, असे स्टेटस सोशल मिडीयावर सुप्रिया सुळे यांनी ठेवले आहे. तसेच, शरद पवारांच्या प्रकृतीची माहिती देत नियमित चेकअपचा हा भाग असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.
रोहित पवारांनीही शरद पवारांच्या प्रकृतीबाबत दिली माहिती
आदरणीय पवार साहेब यांना डिहायड्रेशनच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सुप्रियाताई सध्या प्रत्यक्ष साहेबांना भेटून पुन्हा बैठकीसाठी येत आहेत. सध्या साहेबांची प्रकृती स्थिर आणि व्यवस्थित असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील दोन दिवस त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू राहतील. त्यामुळं साहेबांच्या तब्येतीबाबत कुणीही काळजी करू नये, अशी माहिती रोहित पवार यांनी सोशल मीडियातून दिली आहे