मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, यात काळजीचे कोणतेही कारण नसून, ते केवळ नियमित वैद्यकीय तपासणीसाठी (रुटीन चेकअप) रुग्णालयात गेले आहेत.
वाढते वय आणि सततच्या राजकीय व सामाजिक व्यग्रतेमुळे शरद पवार यांच्या प्रकृतीची नियमित काळजी घेणे आवश्यक असते. याच पार्श्वभूमीवर, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या काही आवश्यक वैद्यकीय तपासण्या ब्रीच कँडी रुग्णालयात केल्या जाणार आहेत.
लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता
शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही गंभीर बाब नाही. त्यांच्या नियमित चाचण्या पूर्ण झाल्यानंतर त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते, नेते आणि राज्यभरातील त्यांच्या चाहत्यांनी प्रकृतीबाबत कोणतीही चिंता करू नये, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
यापूर्वीही रुग्णालयात दाखल झाले होते
यापूर्वी एप्रिल महिन्यातदेखील शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शरद पवार दिल्लीहून आल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे उपचारासाठी त्यांना अॅडमिट करण्यात आले. दोन दिवसात डिस्चार्ज मिळणार होता मात्र डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात आले होते. यावेळी देखील रुटीन चेकअपमुळे शरद पवारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.