मुंबई : संसदेच्या विशेष अधिवेशनात भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून येत्या सोमवारी लोकसभेत मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात येणार आहे. गेल्या अधिवेशनात इंडिया आघाडीने लोकसभेत हे विधेयक हाणून पाडले होते. डिलिमिटेशन हे घटनादुरुस्ती विधेयक असल्याने त्यासाठी दोन तृतीयांश म्हणजे 360 मतांची गरज आहे. भाजपने शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, द्रमुक यांच्यासह आणखी काही पक्षांची मनधरणी करुन या मतांची बेगमी केल्याने यावेळी संसदेत डिलिमिटेशन विधेयक मंजूर होण्याची भाजपाला आशा आहे.
या विधेयकाला शरद पवार यांची राष्ट्रवादी पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात आणि मविआच्या गोटात मोठी खळबळ उडाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची डिलिमिटेशनसंदर्भातील नेमकी भूमिका अद्याप समोर आलेली नाही. शरद पवार यांची प्रकृती व्यवस्थित नसल्याने ते सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. शनिवारी उद्योजक गौतम अदानी यांनी रुग्णालयात येऊन शरद पवार यांची भेट घेतली.
गौतम अदानी हे सकाळी साधारण 11 वाजता शरद पवार यांच्या भेटीसाठी ब्रीच कँडी रुग्णालया दाखल झाले होते. त्यांनी रुग्णालयात येऊन शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यानंतर गौतम अदानी हे तब्बल दोन तास रुग्णालयात होते. ते दुपारी साधारण एक वाजण्याच्या सुमारास ब्रीच कँडी रुग्णालयातून बाहेर पडले. गौतम अदानी हे देशातील आघाडीचे आणि सर्वात श्रीमंत उद्योजक आहेत. अशा उद्योजकांचा प्रत्येक क्षण, मिनिट, तास महत्त्वाचे असतात. असे असतानाही गौतम अदानी ब्रीच कँडी रुग्णालयात दोन तास नेमके काय बोलत होते, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. सध्या डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरुन राज्य आणि केंद्रीय पातळीवर महत्त्वाच्या राजकीय घडामोडी सुरु असताना शरद पवार आणि गौतम अदानी यांची ब्रीच कँडी रुग्णालयातील भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीत उभयतांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.