पुणे: मर्सडीज बेंज, फॉक्सवॅगण, स्कोडा, ह्युंदाई यांसारख्या जागतिक कंपन्यांमुळे चाकण एमआयडीची एक वेगळी ओळख आहे. पण इथले खड्डे, अभूतपूर्व वाहतूक कोंडी आणि होणारे अपघात नित्याचे झाले आहेत. या त्रासाला कंटाळून 20 लघुउद्योगांनी त्यांच्या कंपनीला टाळे लावण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. चाकण एमआयडीसीमधील 20 कंपन्या सातारा जिल्ह्यातील खंडाळा एमआयडीसी स्थलांतरित होणार आहेत. त्यासाठी या वीस कंपन्यांनी संघटना स्थापन केली. त्याद्वारे जागा मिळवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरु केल्यात. या वीस कंपन्या स्थलांतरित झाल्यावर एक हजार कोटींच्या उलाढलीवर परिणाम होणार आहे, चार हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडणार आहे. चाकण आणि परिसरातील अभूतपूर्व वाहतूक कोंडीतून सुटका होत नसल्यानं चाकण एमआयडीला हा मोठा फटका बसायला सुरुवात झाली आहे. याचपार्श्वभूमीवर सध्या राजकारण तापलं आहे. चाकण एमआयडीसीच्या प्रश्नावरुन विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील एक्सवर पोस्ट करत टीका केली. चाकण औद्योगिक वसाहतीतील तब्बल 20 कंपन्यांनी वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी, वीज आणि रस्त्यांच्या समस्यांमुळे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याची बाब अत्यंत गंभीर आहे. या कंपन्यांमध्ये सुमारे 2,000 हून अधिक कामगार कार्यरत आहेत. हे उद्योग स्थलांतरित होऊ नयेत, रोजगाराच्या संधी टिकून राहाव्यात आणि राज्याची औद्योगिक ताकद कायम राहावी यासाठी राज्य सरकारने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, असं शरद पवारांनी सांगितले. शरद पवारांच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर देत चाकण एमआयडीसीमध्ये काही समस्या निश्चितपणे आहेत. मंत्री उदय सामंत यांना तेथे लक्ष घालण्यास निर्देशित करण्यात आले आहे. एकही उद्योग तेथूनही बाहेर जाणार नाही, असाच आमचा प्रयत्न असेल. महाराष्ट्र उद्योगस्नेही आहेच. म्हणून सातत्याने परकीय गुंतवणूक ही राज्यात अधिक येते. सातत्याने क्रमांक 1 वर आपण आहोत आणि राहू, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही चाकण एमआयडीसीतील समस्या प्राधान्यानं सोडवणार, असं आश्वासन दिलं.
चाकण MIDC वर सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
चाकण एमआयडीसीतील रस्ते, वाहतूक तसंच अन्य पायाभूत सुविधांशी संबंधित अडचणी प्राधान्यानं सोडवण्यात येतील. या समस्यांवर तातडीनं मार्ग काढण्यासाठी चाकण येथील उद्योजक, एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक प्रशासन तसंच जिल्हा प्रशासनासोबत लवकरच बैठक घेण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या. तसेच या संदर्भात आज चाकण नागरी कृती समिती व औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी धनंजय शेडबाळे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. उद्योजकांच्या समस्या जाणून घेतल्या तसंच त्या सोडवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत त्यांना आश्वस्त केल्याची माहिती सुनेत्रा पवारांनी दिली.
सदर प्रश्नांच्या अनुषंगानं एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी,पीएमआरडीएचे आयुक्त अभिजीत चौधरी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, खेडचे प्रांत अधिकारी अनिल दौंडे आणि चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. चाकणच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा सक्षम करणं ही प्राथमिकता आहे. सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन समन्वयानं या समस्यांवर लवकरच ठोस मार्ग काढण्यात येईल, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.
चाकण MIDCवर फडणवीस काय म्हणाले?
चाकण एमआयडीसीमध्ये काही समस्या निश्चितपणे आहेत. मंत्री उदय सामंत यांना तेथे लक्ष घालण्यास निर्देशित करण्यात आले आहे. एमआयडीसीच्या पुढाकाराने 12 ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमआरडीए, राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण, जिल्हा परिषद अशा सर्व संबंधित यंत्रणांची एक बैठक घेण्यात आली आहे. सर्व समस्या ऐकून घेत, त्यावर समाधान काढण्यासाठी एक अल्पकालीन आणि एक दीर्घकालिन असा आराखडा निश्चित करण्यात आला आहे. एकही उद्योग तेथूनही बाहेर जाणार नाही, असाच आमचा प्रयत्न असेल. महाराष्ट्र उद्योगस्नेही आहेच. म्हणून सातत्याने परकीय गुंतवणूक ही राज्यात अधिक येते. सातत्याने क्रमांक 1 वर आपण आहोत आणि राहू, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.