शरद पवारांची प्रकृती स्थिर ब्रिच कँडीच्या डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट

Foto
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात शरद पवार यांच्यावर उपचार सुरू होते. तेथून त्यांना घरी सोडण्यात आले होते. परंतु, मुंबईत आल्यावर शरद पवार यांना ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत ब्रिच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे. 

पुढील तपासण्यांसाठी आम्ही बाबांना ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल  करत आहोत. तुम्ही व्यक्त केलेली काळजी आणि व्यक्त केलेल्या सदिच्छांसाठी आम्ही आभारी आहोत, अशी पोस्ट सुप्रिया सुळे यांनी काल सोशल मीडियावर केली होती. यानंतर आज शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत ब्रिच कँडी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी माहिती दिली.

शरद पवार यांची प्रकृती आता स्थिर
ब्रिच कँडी हॉस्पिटलचे उप-समन्वयक प्रतीत समदानी यांनी पत्रकारांना सांगितले की, शरद पवार यांना कफाचा त्रास होतो आहे. तसेच श्वसन मार्गाचा संसर्ग झाला आहे. शरद पवार यांना काल रात्री ब्रिच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शरद पवार यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शरद पवार यांच्या प्रकृतीवर तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक लक्ष ठेवून आहे, असे सांगण्यात आले आहे. 

दरम्यान, खोकल्याचा त्रास झाल्यामुळे शरद पवार यांना पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. दोन दिवसांच्या उपचारांनंतर डिस्चार्ज देण्यात आला होता. शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना फोन करून प्रकृतीची विचारपूस केली. पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना विश्रांती घेण्याचा सल्ला देत, तुम्ही काळजी घ्या, सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, असे म्हटल्याची माहिती देण्यात आली.