नागपूर : भाजपचीही काँग्रेस व्हायला लागली तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कट्टर हिंदुत्व बाळगणाऱ्या दहा भाजप उभ्या करू शकतो, हे त्यांनी लक्षात ठेवावे. आम्हाला कुणीच हरवू शकत नाही, आता आम्हीच आहोत, या अहंकारात भाजपने राहू नये, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले.राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आयोजित तीन दिवसीय रामस्मरण व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प गुंफतांना भारत एक हिंदू राष्ट्र या विषयावर पोंक्षे बोलत होते. रेशीमबाग येथील महर्ष व्यास सभागृहात हा कार्यक्रम झाला.
आज भारतामध्ये हिंदूंचे सण, उत्सव मोठ्या थाटात साजरे केले जात आहेत. गर्वाने म्हणा आम्ही हिंदू आहोतफ, असे म्हणण्याची ताकद केवळ केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमुळे आहे. याचे संपूर्ण श्रेय मोदींसोबत संघाला जाते. शंभर वर्षात अनेक उपेक्षा सहन करूनही संघ आज ताठ उभा आहे. संघ ही भाजपची आई आहे. मात्र, भाजपची काँग्रेस व्हायला लागली तर अशा दहा भाजप संघ उभा करू शकतो, हे त्यांनी लक्षात ठेवावे. पुन्हा दहा-पंधरा वर्षे वाट पाहावी लागली तरी चालेल. पण, कट्टर हिंदूच्या दहा भाजप उभ्या करण्याची ताकद संघात आहे, असेही शरद पोंक्षे म्हणाले.
राहुल गांधी पंतप्रधान झाले तर वाटोळे होईल...
मोदींच्या सरकारमुळे आज हिंदू धर्माला चांगले दिवस आले. परंतु, मधल्या काळात जर काँग्रेस नेते राहुल गांधी पंतप्रधान झाले असते तर देशाचे वाटोळे झाले असते. काँग्रेसच्या कुठल्याही आंदोलनाने देशाचे भले झाले नाही. त्यांच्या कुठल्याही आंदोलनामुळे देशाला स्वातंत्र मिळाले नाही. मुळात हा पक्षत ब्रिटिशांनी स्थापन केलेला आहे, अशी टीका त्यांनी केली.
मनुस्मृती जाळणाऱ्यांनी ती वाचली नाही
हिंदू धर्मातील प्रत्येक धर्मग्रंथ महान आहे. हजारो काळांपूर्वी आमच्याकडे सर्व शोध लागले आहेत. मोठमोठ्या आजारांबाबतची माहिती आमच्या धर्मग्रंथांमध्ये नमूद आहे. मात्र, मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीने आमचा धर्म, संस्कृती आणि परंपरांचा अभ्यास करू न देता केवळ गुलाम केले. मनुस्मृतीमध्ये कुणालाही दुय्यम वागणूक दिलेली नाही. ती जाळणाऱ्यांनी वाचली नाही. वाचली असती तर ते जाळूच शकले नसते, असा दावा शरद पोंक्षे यांनी केला.
भारत हिंदू राष्ट्रच होता
स्वातंत्र्याला 79 वर्षे उलटूनही हिंदूबहुल भारतात हिंदूंनाच स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो, ही मोठी शोकांतिका आहे. जोपर्यंत हिंदू समाज संघटित होऊन स्वतःच्या हक्कांप्रती पूर्णपणे जागृत होत नाही, तोपर्यंत हिंदूंचे प्रभावी एकत्रीकरण होणार नाही. भारत हिंदू राष्ट्र होता, आहे आणि राहीलच; मात्र आता प्रत्यक्ष अधिकृतरित्या भारत हिंदू राष्ट्र घोषित व्हायला हवा, असेही शरद पोंक्षे म्हणाले.