लातूर: काँग्रेसला मानवाधिकाराची भाषा शोभत नाही. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काश्मीरमधील फुटिरतावाद्यांसोबत आहे. काँग्रेसकडून देशाला कोणतीच अपेक्षा नाही. मात्र, आज शरद पवार फुटीरतावादी लोकांसोबत आहेत. शरदराव तुम्ही अशा लोकांसोबत उभे आहात, हे तुम्हाला शोभतं का? असा सवाल करतानाच राजकारण वेगळी गोष्ट आहे, मात्र पवार तिकडे शोभत नाहीत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
लातूर जिल्ह्यातील औसा येथे लातूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे व उस्मानाबाद मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ आज आयोजित केलेल्या जाहीर सभेत मोदी बोलत होते.लोकसभा निवडणुकीसाठी भाजप व शिवसेनेची युती झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या सभेत एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. या सभेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, उमेदवार सुधाकर शृंगारे, ओमराजे निंबाळकर, नागनाथ निडवदे, शैलेश लाहोटी, आदींसह भाजप, शिवसेनेचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. मोदींनी यावेळी काँग्रेससह शरद पवार यांच्यावरही खरपूस टीका केली. ज्यांना काश्मीरमध्ये वेगळा पंतप्रधान हवाय, त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आहेत. काँग्रेसकडून कोणतीही अपेक्षा केली जात नाही; पण शरदराव तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, अशा शब्दांत मोदींनी पवारांवर टीकास्त्र सोडले. राष्ट्रीय सुरक्षेसाठी आम्ही संकल्प केला आहे. जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविण्यात येणार नाही, असे काँग्रेस म्हणतेय. काँग्रेसचं ढकोसलापत्र (जाहीरनामा) आणि पाकिस्तानची भाषा एकच आहे. काँग्रेसलाही फुटीरतावाद्यांशी चर्चा करायची आहे आणि पाकिस्तानलाही तेच हवं आहे. अतिरेक्यांना त्यांच्या घरात घुसून मारणं हीच आता नव्या भारताची नीती आहे. दहशतवादाचा नायनाट करणं हा आमचा संकल्प आहे. जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रवाद्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्यात आला आहे. तिथे परिस्थिती सामान्य होताना दिसत आहे. घुसखोरांची ओळख पटविण्यातही आम्ही यशस्वी झालो असून यापुढे आम्ही घुसखोरीला लगाम घालू, असे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करा ः उद्धव ठाकरे
आपल्याला मोदींना पंतप्रधान करायचं आहेच. आपल्याकडे पंतप्रधानपदासाठी एकच नाव आहे ना? पण विरोधकांकडे एकही नाव नाही. तुम्हीच सांगा विरोधकांचा पंतप्रधान कोण? शरद पवार, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव किंवा ओवेसींना करायचं का पंतप्रधान? असा सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या महाआघाडीवर टीका केली. हिंमत असेल तर पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करा? असे आव्हानही ठाकरेंनी विरोधकांना दिले.