पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्रातले दिग्गज नेते शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शरद पवार यांना २२ फेब्रुवारीला रुग्णालयात पुन्हा एकदा दाखल करण्यात आलं होतं. शरद पवार यांना थोडा त्रास जाणवू लागल्याने आणि त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने त्यांना या रुग्णालयात दुसर्यांदा दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांना आता डिस्चार्ज मिळाला आहे. शरद पवार आता मुंबईत जाणार असून तिथल्या ब्रीचकँडी रुग्णालयात रुटीन चाचण्यांसाठी दाखल होतील अशी माहिती सुप्रिया सुळेंनी माध्यमांना दिली आहे.
फेब्रुवारी महिन्यात शरद पवार दोनदा रुग्णालयात
शरद पवार बारामती येथील त्यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी होते. तेव्हा शरद पवारांना अचानक त्यांना खोकला आणि कफचा त्रास जाणवू लागला, त्यानंतर डॉक्टरांचं एक पथक घरी येऊन तपासणी करून गेलं. त्यानंतर त्यांना तातडीने पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ते पाच दिवस रुबी रुग्णालयात होते. पाच दिवसांच्या उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारली होती. २२ फेब्रुवारीला त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली होती. आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज-सुप्रिया सुळे
शरद पवार यांना रूबी हॉल क्लिनिक रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. आज शरद पवारांना मुंबईत आणलं जाईल. मुंबईत त्यांचे जे डॉक्टर आहेत त्यामुळे तिथे ब्रीच कँडी रुग्णालयात ते दाखल होणार आहेत. दर सहा महिन्यांनी किंवा वर्षाने त्यांच्या ज्या रुटीन टेस्ट असतात त्या तिथे होणार आहेत. साधारण दोन ते तीन दिवस ते ब्रीचकँडी रुग्णालयात असतील अशी माहिती खासदार सुप्रिया सुळेंनी माध्यमांना दिली.
अशक्तपणा जाणवत असल्याने शरद पवार रुग्णालयात
शरद पवार यांना काहीसा अशक्तपणा जाणवत होता. त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याचे सांगितलं गेलं. त्यामुळे रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांना सलाईन लावलं जाणार आहे, अशी माहिती समोर आली होती. अशक्तपणा वगळता शरद पवार यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर होती. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर शरद पवार हे अनेक दिवस बारामतीमध्ये होते. त्यांनी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्या भेटीगाठी घेऊन पवार कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न केला होता. यादरम्यान, अचानक त्यांची प्रकृती बिघडली होती. आता त्यांना डिस्चार्ज मिळाल्याची माहिती सुप्रिया सुळेंनी दिली आहे.