'तिच्या’साठी नेमलेली ‘ती’ दिसेना... शैक्षणिक आवारात टवाळखोरांचा उच्छाद वाढला; मुलींची सुरक्षा वार्‍यावर

Foto
'
औरंगाबाद : सध्या शाळा, महाविद्यालये सुरू झाले असून, विविध शैक्षणिक संस्थांच्या आवारात टवाळखोर तरुणाची मोठी गर्दी दिसत आहे. महिला व तरुणींच्या सुरक्षिततेसाठी पोलिस दलाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या ‘तिच्या’साठी ‘ती’या विशेष पथकातील महिला कर्मचारी मात्र शैक्षणिक संस्थांच्या परिसरात दिसत नसल्याचे सध्याचे चित्र आहे.

पोलिस आयुक्‍त चिरंजीव प्रसाद व उपायुक्‍त डॉ. दीपाली धाटे-घाटगे यांच्या संकल्पनेतून शहरातील तरुण मुली व महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, अडचणीच्या काळात त्यांना तातडीने मदत मिळावी म्हणून  ‘तिच्या’साठी ‘ती’ या घोषवाक्याखाली महिला पोलिस कर्मचार्‍यांचे विशेष पथक तयार कटण्यात आले होते. या पथकामध्ये दुचाकी चालविता येत असलेल्या महिला कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली होती. सुमारे 6 ते 8 महिन्यांपूर्वी या पथकांची निर्मिती करण्यात आली होती. सुरुवातीच्या काळात ठिकठिकाणी या पथकातील कर्मचारी दुचाकीवरून गस्त घालताना दिसत होत्या. मात्र, अलिकडच्या काळात  ‘तिच्या’साठी असलेली ‘ती’ दिसेनाशी झाली आहे.
सध्या शाळा, महाविद्यालयांत विद्यार्थिनींची तसेच बाजारातही महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. निराला बाजार, औरंगपुरा, सिडको, जालना रोड, सिडको, हडको, शिवाजीनगर आदी भागात शैक्षणिक संस्था आणि खाजगी शिकवणी क्लासेस मोठ्या प्रमाणात असून, शिक्षण घेणार्‍या मुलींचे प्रमाणही प्रचंड आहे. शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने या परिसरात आता टवाळखोर तरुणांचा उच्छाद वाढला आहे. दुचाकीवरून तरुणीचा पाठलाग करणे, शिट्ट्या वाजविणे, कॉमेंट्स करणे, वाहने सुसाट चालविणे, मोठमोठ्या आवाजात हॉर्न वाजविणे असे प्रकार सातत्याने होत आहेत. मात्र, भीतीपोटी विद्यार्थिनी हा प्रकार ना पोलिसांना सांगतात ना पालकांना. त्यामुळे टवाळखोरांची हिम्मत अजून वाढत चालली आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठीच पोलिस आयुक्‍त आणि उपायुक्‍तांनी ‘तिच्या’साठी ‘ती’ ही संकल्पना शहरात राबविण्यास सुरुवात केली होती. मात्र, तरुणी व महिलांच्या सुरक्षेसाठी नेमलेली ‘ती’च दिसेनाशी झाल्याने आता ‘ति’ची सुरक्षा कोण करणार, असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

दामिनी पथकाचे अस्तित्व कागदावरच!
8 तरुणी व महिलांची छेड काढणार्‍या टवाळखोर तरुणांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलिस दलातर्फे दामिनी पथकही स्थापन करण्यात आले आहे. मात्र, हे पथक सध्या कागदावरच असल्याचे दिसून येते. सिडको, हडको व शहराच्या अन्य भागात शाळा, महाविद्यालय परिसरात रोडरोमिओंकडून विद्यार्थिनींची छेड काढण्याचे प्रकार घडत आहेत. अशा टवाळखोरांच्या त्रासाला विद्यार्थिनी वैतागल्या आहेत. पोलिसांनी याकडे त्वरित लक्ष देऊन अशा टवाळखोरांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker