हैदराबाद : हैदराबादमधील एका महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या मृत्यूच्या तपासाला अत्यंत धक्कादायक आणि अजब वळण मिळाले आहे. मूळची आंध्र प्रदेशची असलेल्या या तरुणीने आत्महत्येपूर्वी जे काही केले, त्याचे सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलिसांचाही थरकाप उडाला आहे. तलावात बुडून मृत्यू झालेल्या या तरुणीसोबत गायब झालेल्या देवीच्या मूर्तीचा शोध आता पोलीस घेत आहेत. तेजस्विनी (वय २५) असे मृत तरुणीचे नाव असून ती आंध्र प्रदेशच्या विजयनगरम जिल्ह्यातील देवपल्ली गावची रहिवासी होती. ती बंगळुरूमध्ये एका आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होती, मात्र सहा महिन्यांपूर्वी तिने नोकरी सोडली होती.
प्राथमिक माहितीनुसार, सुरुवातीला हे आत्महत्येचे सामान्य प्रकरण वाटत होते. मात्र, पोलिसांनी जेव्हा घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले, तेव्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला. घटनेच्या रात्री तेजस्विनीने तिचे सर्व कपडे काढले आणि ती नग्न अवस्थेत पीरजादीगुडा येथील एका मंदिरात धावत दाखल झाली. तिथे गेल्यावर तिने देवी अम्मावरुची मूर्ती उचलली आणि थेट जवळच्या तलावाकडे चालत गेली. ती मूर्ती छातीशी धरूनच तिने तलावाच्या पाण्यात उडी घेतली. सुरुवातीला तिने आत्महत्या केली असावी असे वाटले आणि हे प्रकरण बंद करण्यात आले, परंतू मंदिरातील मूर्ती चोरीला गेली असल्याने त्याचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात तेजस्विनी दिसली आणि पुन्हा हे प्रकरणाचा तपास सुरु करावा लागला.
तलावात शोधमोहीम; मूर्ती बनली मुख्य पुरावा
डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सने तलावात मूर्ती शोधण्यासाठी बोटी तैनात केल्या आहेत. तपास अधिकार्यांच्या मते, ही मूर्ती या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरू शकते. पोलिसांनी तेजस्विनीची आई अरुणा यांची चौकशी केली आहे. पोलीस तेजस्विनीचे कथित डेथ डिक्लेरेशन (मृत्यूपूर्व विधान), तिचे बँक व्यवहार आणि घटनेपूर्वीच्या काही दिवसांतील तिच्या हालचालींची कसून चौकशी करत आहेत.
महिना १ लाख रुपये भाडे! लॉजचे कनेक्शन काय?
तपासादरम्यान पोलिसांना आणखी एक चक्रावून टाकणारी माहिती मिळाली आहे. तेजस्विनी ज्या इमारतीत भाड्याने राहत होती, तिथे ती दररोज ३,५०० रुपये म्हणजेच महिन्याला सुमारे १ लाख रुपये भाडे देत होती. धक्कादायक बाब म्हणजे, या इमारतीचे वरचे दोन मजले एका लॉजप्रमाणे बेकायदेशीरपणे चालवले जात होते. या लॉजचा आणि तेजस्विनीच्या मृत्यूचा काही संबंध आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.