छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत शिक्षक भारती संघटनेने डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना जाहीर व सक्रिय पाठिंबा दिला आहे. शिक्षक भारतीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या संघटनेने डॉ. पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे आणि कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे यांनी दि. १९ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध
केलेल्या अधिकृत पत्राद्वारे संघटनेची भूमिका स्पष्ट केली. डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या विजयासाठी संघटनेचे विभागीय अध्यक्ष आणि सर्व जिल्हाध्यक्ष प्रचारकार्यात सक्रिय सहभाग घेऊन काम करतील, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. याप्रसंगी शिक्षक भारतीचे सुभाष मेहर यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांसाठी कार्यरत असलेल्या शिक्षक भारती संघटनेचा जाहीर पाठिंबा डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या उमेदवारीसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. आगामी निवडणुकीत शिक्षक भारतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कशा प्रकारे प्रचारात सहभागी होतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions














