सिल्लोड, (प्रतिनिधी): शिंदेफळ येथे नवनाथांपैकी एक असणाऱ्या कानिफनाथ महाराजांच्या यात्रा उत्सवाला १८ मार्चपासून सुरुवात होणार आहे तीन दिवस ही यात्रा चालणार आहे ग्राम संसद कार्यालयाचे वतीने यात्रा उत्सवाची जयत तयारी करण्यात आली आहेत या यात्रेला अनेक वर्षाची परंपरा आहे ही यात्रा गुढीपाडव्याच्या आदल्या दिवसापासून सुरू होते.
गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी संपते पहिल्या दिवशी संदल आणि तमाशा असतो संदल हा पारंपारिक पद्धतीने वाजत गाजत नाथाच्या मंदिरात नेला जातो. संदलच्या ताटामध्ये मलिदा असतो गहू, ज्वारी, बाजरीपासून तयार केलेली चपाती भाकरी बारीक चुरून त्यात गुळ, गावरान तूप एकत्र करून मलिदा बारीक बनविला जातो.
पाच कणकेचे दिवे उदगलप देवाला घालायला फुलांच्या हार गंध गोळी अगरबत्ती यापासून मलिदाचे ताट सजवले जाते. संदलच्या दिवशी तमाशा रात्री नऊ वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत असतो. मुख्य यात्रेचा दिवस म्हणजे गुढीपाडवा या दिवशी सकाळी मारुतीला शेंदूर लावण्याचा कार्यक्रम होतो.
दुपारनंतर सर्व जाती धर्माच्या लोकांचे संदल कानिफनाथाला प्रसाद म्हणून देतात दिवसभर यात्रेत भक्तांची रेलचेल दिसून येते. सहापासून तगतराव निघतो. रात्री आठ वाजेपर्यंत राहतो आठ वाजता मारुतीला घागर पूजली जाते. नंतर आरती होते. रामकाठी आणि फटाक्याची आतिश बाजी होती. तिसऱ्या दिवशी जंगी कुस्त्याचा आखाडा असतो. या यात्रेचा सर्व परिसरातील मंडळींनी आनंद घ्यावा, असे ग्रामस्थांच्या वतीने आवाहन केले आहे













