मागील अनेक दिवसांपासून युतीबाबत सुरु असलेल्या तर्कवितर्कांना अखेर पूर्णविराम लागला असून शिवसेना व भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणूक सोबत लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी हि घोषणा केली आहे. शिवसेना व भाजपा लोकसभेच्या अनुक्रमे २३ व २५ जागा लढवणार आहेत तर विधानसभेसाठी ५०-५० चा फार्म्युला ठरला आहे.
दोन्ही पक्षामध्ये अनेक मुद्द्यांवर मतभेद आहेत. मात्र, हिंदुत्व हा दोन्ही पक्षामधील सामान दुवा आहे. त्यामुळे व्यापक विचार करून सेना भाजपाने युती करण्याचा निर्णय घेतला आला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुंक्त पत्रकार परिषदेत दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. त्यांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्यांवर भाजपा सकारत्मक विचार कारणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. झालं गेलं विसरून जाऊन आता एकदिलाने लढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. राममंदिर हा देशाच्या श्रद्धेचा विषय असून लवकरात लवकर राममंदिर निर्माण झाले पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. नाणार प्रश्न, शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी आपण आग्रही असल्याचेही त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला भाजपा पक्षाध्यक्ष अमित शहा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे या प्रमुख नेत्यांबरोबर शिवसेना भाजपचे अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होते.