छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : जुन्या शहरात बेशिस्त हातगाड्यांमुळे वाहतूक कोंडीसह वाद व भांडणे वाढत चालली आहेत. या प्रश्नावर कायमचा तोडगा काढावा, यासाठी नगरसेवक ऋषिकेश जैस्वाल यांनी महापालिका प्रशासनाला १० फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. तोपर्यंत नियोजन न केल्यास आम्ही शिवसेना स्टाईल आंदोलन करू, संघर्ष करण्याची वेळ आली तर आम्ही मागे हटणार नाही, एमआयएम नेते व नगरसेवकांनी विरोध केल्यास ईट का जवाब पत्थर से मिलेगा, असा इशाराही जैस्वाल यांनी दिला आहे.
शहागंज भागात मोठ्या प्रमाणात हातगाड्यावर फळ, भाजीपाला विक्री केली जाते. दोन आठवड्यापूर्वी या भागात एका गर्भवती महिलेला व तिच्या पतीला हातगाडीवाल्यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेचे व्हिडिओ शिवसेना जिल्हाप्रमुख तथा उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले, तसेच पोलीस आयुक्त आणि मनपा आयुक्तांशी संपर्क साधून कारवाई करण्यास भाग पाडले. त्यानंतर दुसर्याच दिवशी महापालिकेच्या पथकाने शहागंजमध्ये कारवाई केली.











