वन विभागाच्या अहवालानुसार खालच्या बाजूची १ लाख ७३ हजार झाडे तुटणार
सिल्लोड, (प्रतिनिधी) : सह्याद्रीची उपरांग असलेल्या अजिंठा डोंगरातील राखीव वन क्षेत्रात येणार्या नायगाव वडोद येथे प्रस्तावित असलेल्या ग्रीन को एनर्जी या कंपनीच्या पी एस पी स्वरूपाच्या या जलविद्युत निर्मिती प्रकल्पामुळे डोंगराच्या खालच्या बाजूस असणारी एक लाख ७३ हजार वृक्ष ही या प्रकल्पासाठी तोडली जाणार असा अहवाल सोयगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाने वरिष्ठांना दिला आहे.
ही संख्या खालच्या बाजूस असणार्या नायगाव वाडी येथील आहे तर प्रकल्पाच्या वरच्या बाजूस येणार्या वडोद विठ्ठलाचे या भागातील वृक्ष गणना गावकर्यांनी हाणून पाडल्यामुळे तेथील वृक्ष गणना होऊ शकली नाही. वरच्या भागातील घनदाट वृक्ष संपदा लक्षात घेता या प्रकल्पासाठी दोन लाखाच्या वर भारतीय प्रजातीची वृक्ष तोडले जाऊ शकतात. लाखो वृक्षांबरोबर खालच्या बाजूस असणारे नऊ माती नाला बांध बंधारे व ९ वनराई बंधारे ही यात उद्ध्वस्त होणार आहे.
सिल्लोड येथील पर्यावरण संवर्धक व सोयगाव वनपरीक्षेत्र विभागाच्या वन्यजीव मनुष्य संघर्ष समितीचे सदस्य असलेले डॉ. संतोष पाटील हे दोन वर्षांपासून या प्रकल्प विरोधामध्ये शासन दरबारी लढा देत आहे. वाडी - नायगाव येथील स्थानिक शेतकर्यांच्या भेटी घेत व वाडी येथील आबा पाटील गव्हाणे, प्रफुल्ल पाटील, रवी राठोड यांनी शेतकर्यांमध्ये जागृती म्हणून श्वास देणार्या जंगलासाठी शेवटचा श्वास ही संकल्पना आखत या भागात युवकांसह शिवार फेरीतून निदर्शन केले. मोहाची शेकडो झाडे या कामी तोडले जाणार असून काही झाडे तर २०० वर्ष वयाची असून २० फुटापर्यंत घेर आहे.
-- झाडांसोबत वन्यजीवन ही धोक्यात --
हा भाग गौताळा अभयारण्य पासून अवघ्या १४ किमी हवाई अंतरावर आहे. या दोन्ही प्रकल्पामुळे हिवरा, पूर्णा, मनुदेवी, खटकाळ, बहुळा, चारणा, खेळणा या नद्या प्रभावित होतील. लाखो लोकांना व हजारो हेक्टर शेत जमिनीस याची झळ बसेल व पर्जन्य छायेतील या भागास हे कदापी परवडणारे नाही. या डोंगरी वनक्षेत्रात पट्टेरी वाघाचे सध्या वास्तव्य १० ते ११ किमी हवाई अंतरावर गौताळा वन्यजीव अभयारन्यात आज ही असून त्याचा हा परिसर भ्रमण मार्ग आहे. याच मार्गातून सदर वाघ विदर्भातील ज्ञानगंगा व टिपेश्वर अभयारण्य या भागात वावरत असतो. या शिवाय शेकडो वन्यजीवांचा भ्रमण (कॉरिडॉर) मार्ग व अधिवास येथे आहे.
ही हिरवी भिंत (ग्रीन वॉल) जिल्ह्याचे फुफ्फुस असून या अभावी खान्देश भागातील उष्णतेच्या तीव्र झळा आपल्या जिल्ह्यास सोसाव्या लागतील.
- डॉ. संतोष पाटील, पर्यावरण अभ्यासक, सिल्लोड












