ग्रामस्थांच्या एकजुटीने साकारला विकासाचा मार्ग
पैठण, (प्रतिनिधी) : शासनाच्या निधीची वाट न पाहता रहाटगाव परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून शिवरस्ता तयार करून ग्रामीण विकासाचा आदर्श निर्माण केला आहे. दावरवाडी गट क्रमांक ५९७व रहाटगाव गट क्रमांक २४२ यांच्या मधून जाणारा हा रस्ता दोन टप्प्यांत पूर्ण करण्यात आला आहे.
दोन वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी लोकसहभागातून सुमारे २००० फूट रस्त्याचे काम पूर्ण केले होते. त्यासाठी सुमारे ३५ हजार रुपये खर्च आला होता. यंदा पैठणपाचोड मुख्य रस्त्यापासून आत सुमारे ७०० फूट लांबीचा व १५ फूट रुंदीचा रस्ता तयार करण्यात आला असून त्यासाठी सुमारे २० हजार रुपये खर्च करण्यात आले. विशेष म्हणजे या कामासाठी लागलेला संपूर्ण निधी लोकवर्गणीतून उभारण्यात आला असून ग्रामपंचायतीकडून कोणतीही आर्थिक मदत घेण्यात आलेली नाही.
या मार्गावर शिवारातील देवीचे मंदिर असून भाविकांना तसेच शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.
शेतीमालाची वाहतूक, शेतकऱ्यांचा संपर्क तसेच धार्मिक स्थळाकडे जाण्यासाठी हा रस्ता उपयुक्त ठरणार आहे. या लोकहिताच्या कार्यासाठी दत्तात्रय फटांगडे, संतोष मिसाळ, नारायण गहाळ, नारायण राऊत, दत्ता गोरे, तुकाराम खंडागळे, राजू मिसाळ, नागेश शिंदे, किशोर मुने, सुरेश राऊत, दत्ता वारकर, परमेश्वर भांगळ, एकनाथ गोरे, बद्रीनाथ बोबडे, दादा डोईफोडे, विलास फासाटे, राजेंद्र उगले आदी शेतकरी व ग्रामस्थांनी आर्थिक तसेच प्रत्यक्ष श्रमदानातून मोलाचे योगदान दिले.
ग्रामस्थांच्या एकजुटीने आणि लोकसहभागातून साकारलेले हे काम परिसरातील इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत असून ग्रामीण विकासासाठी लोकशक्ती किती प्रभावी ठरू शकते याचे हे उत्तम उदाहरण मानले जात आहे. रहाटगाव परिसरातील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून शिवरस्ता उभारून ग्रामीण विकासाचा आदर्श निर्माण केला आहे.
शासनाच्या मदतीची वाट न पाहता स्वतःच्या श्रम, वेळ आणि आर्थिक योगदानातून रस्ता तयार करणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. अशा उपक्रमांमधून गावातील एकोपा, सामाजिक बांधिलकी आणि विकासाची जाणीव दिसून येते.
- किशोर तांगडे, सामाजिक कार्यकर्ते











