किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी,

Foto
रायगड : किल्ले रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५२वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतोय. या सोहळ्याला देशभरातून हजारो शिवभक्तांची मांदियाळी राजगडावर जमली आहे.
दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५२वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतोय. या सोहळ्याला देशभरातून हजारो शिवभक्तांची मांदियाळी राजगडावर जमली असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परिणामी किल्ले रायगडावर शिवमय वातावरण निर्माण झाले असून अवघा रायगड महाराजांच्या जयजयकाराने दुमदुमला आहे.

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा आज किल्ले रायगडावर साजरा होत आहे. हा नेत्रदीपक सोहळा अनुभवण्यासाठी देशभरातून लाखो शिवभक्त किल्ले रायगडावर दाखल झाले आहेत.  राज सदरेवरील मेघडंबरीला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. भगवे झेंडे, पताका, पोवाडे आणि शिवरायांचा जयजयकार यामुळे वातावरण शिवमय झालं आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यासह जगभरातून शिवभक्त दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडावर दाखल झाले आहे. या सोहळ्याला ध्वजवंदनाने सुरुवात होईल. त्यानंतर शिवपालखी वाजत गाजत राजसदरेवर येईल आणि शिवराज्याभिषेकाचा मुख्य सोहळा सुरू होईल. उत्सव मूर्तीस अभिषेक झाल्यानंतर सिंहासनारूढ शिवपुतळ्याला सुवर्ण मुद्रांचा अभिषेक केला जाईल. युवराज संभाजीराजे छत्रपती महाराज यांच्या मार्गदर्शनानंतर राजसदर ते जगदीश्वर मंदिर अशी पालखी मिरवणूक निघेल.शिवसमाधीला अभिवादन करून सोहळ्याची सांगता होईल. संपूर्ण रायगड शिवरायांच्या जयजकाराने दुमदुमला असून गडाइतकीच गडाच्या खाली शिवभक्तांची गर्दी बघायला मिळत आहे. विविध सांस्कृतीक, पारंपरिक आणि लोक नृत्यांनी गडावर शिवकाळाची अनुभूती सध्या गडावर सार्‍यांना येत आहे.

दुसरीकडे, कोल्हापुरात नवीन राजवाड्यावर ३५२ शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातोय. नवीन राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये हा सोहळा पार पडला जाणार आहे. त्याआधी नवीन राजवाड्याच्या समोर ढोल पथकाचे सादरीकरण होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णमूर्तीवर दुग्धाभिषेक केला जातोय. नवीन राजवाड्यातील शिवराज्याभिषेक सोहळ्याला कोल्हापुरातील मान्यवर हजेरी लावत आहेत.