छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहरातील बहुतांश भागांत पाचव्या दिवशी पाणीपुरवठा होत असताना हडको एन-१२ येथील शिवछत्रपतीनगरातील नागरिकांना १५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाणी मिळत आहे. त्यातही हसूल तलावातून येणारे पाणी गाळयुक्त व दूषित असल्याने नागरिकांचा संताप सोमवारी (दि. ५) महापालिका मुख्यालयात उफाळून आला. शिवछत्रपती संघर्ष कमिटीच्या नेतृत्वाखाली महिला व नागरिकांनी अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांच्या दालनासमोर सुमारे दोन तास ठिय्या आंदोलन केले.
मनपा आयुक्त सुटीवर असल्याने आंदोलकांनी अतिरिक्त आयुक्तांकडे पाणीप्रश्न मांडला. प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आल्यानंतरही समाधान न झाल्याने नागरिकांनी महापौर समीर राजूरकर यांची भेट घेत नियमित व शुद्ध पाणीपुरवठ्याची मागणी केली. हडको, हसूल, बेरीबाग, रोजाबाग यांसह शहरातील सुमारे १६ वॉर्डाना
हसूल तलावातून पाणीपुरवठा केला जातो. या पाण्यात गाळ व दूषितपणा असल्याच्या तक्रारी अनेक वर्षांपासून आहेत. शिवछत्रपती नगरात पाणीपुरवठ्याचे अंतर १५ दिवसांपर्यंत
पोहोचल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. पाणी आल्यानंतरही ते वापरण्यायोग्य नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. नव्या पाणीपुरवठा योजनेत जायकवाडी धरणातून शुद्ध पाणी आले मिळेल, असे यापूर्वी सांगण्यात आले. मात्र, योजना पूर्ण होईपर्यंत दूषित पाण्याचा सामना करावा लागत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. दूषित पाण्यामुळे लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने तातडीने शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनात दिनेश वोस्थिर, भागीरथी मुळे, उषा शेजुळ, सुभद्रा घेळवे, मंगला पवार, संगीता आव्हाले, शकुंतला तावर, गंगुबाई चोपडे, शीतल राजपूत, कविता राजपूत, सुनीता काकरवाल, छाया भालेराव, सुनंदा जोशी, अनिता धायडे यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions















