शिवसेना जिल्हाप्रमुख आंबादास दानवे म्हणालेे- मराठवाड्यातील शिवसैनिक रेल्वेने जाणार अयोध्येला

Foto

औरंगाबाद – शिवसेना नेते उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबरला अयोध्येकडे कूच करणार आहेत. या मोहिमेसाठी औरंगाबादसह मराठवाड्यातील शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जाणार असून त्यांच्यासाठी विशेष रेल्वेची सोय केली जाणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सांगितले आहे. या मोहिमेचा प्रचार शहरात व्हावा यासाठी शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ औरंगपूरा येथे मंदिर हम ही बनाएंगेअसे होर्डिंग शिवसेनेने लावले आहे.

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या दसरा मेळाव्यात येत्या २५ नोव्हेंबरला आपण अयोध्येला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघही आता राम मंदिर मुद्द्यावरुन आक्रमक झाला आहे तो आमच्यामुळेच, असेही उद्धव यांनी संघाच्या तीन दिवसानंतरच्या शिबिरानंतर म्हटले होते. लोकसभा निवडणुकीआधी राम मंदिराचा मुद्दा हायजॅक करण्याचे हे शिवसेनेचे प्रयत्न असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. राम मंदिराच्या मुद्द्यावर हिंदूत्ववादी संघटनांसह काँग्रेसनेही आमच्या आंदोलनात सहभागी व्हावे असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नुकतेच म्हटले होते. यामुळे येत्या काळात राम मंदिराचा विषय चर्चेत राहाणार हे निश्चित आहे.

 

औरंगाबाद जिल्हाप्रमुख दानवे यांनी सांजवार्ता ऑनलाईनसोबत बोलताना सांगितले की औरंगाबाद आणि मराठवाड्यातील शिवसैनिकांसाठी विशेष रेल्वे बुक करणार आहे. परंतू मराठवाड्यातून किती कार्यकर्ते अयोध्येला जाणार हे सांगण्याचे त्यांनी टाळले. यामुळे अयोध्येला जाण्याची नेत्यांची तयारी असली तरी कार्यकर्त्यांचा त्यांना किती पाठिंबा मिळतो हे लवकरच समजणार आहे.