औरंगाबाद- शासनाने दिलेल्या निधीतून करण्यात येणार्या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि स्मार्ट सिटी योजनेतील सिटी बससेवेचा शुभारंभ २३ डिसेंबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमाला शहर विकासासाठी महापालिकेला कोट्यवधींचा निधी दिलेल्या मुख्यमंत्र्यांची वेळ घेण्याअगोदर महापौर नंदकुमार घोडेले व शिवसेना पदाधिकार्यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची वेळ घेतली आहे. या प्रकारावरून सेना-भाजपच्या पदाधिकार्यांत कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे.
शहरातील कचरा, रस्त्याचा प्रश्न सोडविण्याकरिता सुमारे १०० कोटी रुपयांचा
निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनपाला दिला आहे. २३ डिसेंबरला रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन, सांडपाणी
प्रक्रिया प्रकल्प व स्मार्ट सिटी योजनेतील सिटी बससेवेचा शुभारंभ करण्याचे मनपाने
नियोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी महापौरांनी अजून मुख्यमंत्री फडणवीस यांचीच
वेळ घेतली नाही. त्यामुळे मुख्यमंत्रांची वेळ घेण्यासंबंधी सोमवारी महापौर घोडेले
व उपमहापौर विजय औताडे यांच्यात चांगलीच शाब्दिक फटकेबाजी झाली. शेवटी उपमहापौर
औताडे यांची समजूत काढत उद्या बुधवारी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यासाठी
जाण्याचे ठरले. आता या कार्यक्रमाला कालावधी अत्यंत कमी राहिल्याने
मुख्यमंत्र्यांची वेळ मिळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एकीकडे हा प्रकार सुरू असतानाच महापौरांनी तीनही
विधानसभा मतदारसंघात विविध कामाचा शुभारंभ करण्याचे नियोजन सुरू केले आहे. यात पश्चिम
मतदारसंघातील कांचनवाडी येथे भूमिगत गटारच्या माध्यमातून सांडपाणी प्रक्रिया
प्रकल्पाचे बांधकाम व येथेच कचर्यापासून गॅस निर्मिती, मध्य
मतदारसंघातील निराला बाजार येथे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ तर पूर्व मतदारसंघातील
कॅनॉट परिसरात स्मार्ट बसचे लोकार्पण करण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून
कचरा कोंडीसह इतर मुद्द्यावरून नागरिकांमध्ये मनपा प्रशासन व सत्ताधारी पक्षाबाबत
विशेषतः शिवसेनेसंबधी नकारात्मक भावना आहे. अशातच लोकसभा व विधानसभा निवडणूक
तोंडावर आल्याने तीनही विधानसभा मतदारसंघात कार्यक्रम ठेवून लोकांचे मनपरिवर्तन
करण्याचा प्रयत्न महापौरांच्या वतीने करण्यात येत असल्याची चर्चा आहे.












