औरंगाबाद- नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील
निकालानंतर हवेत असलेली भारतीय जनता पार्टी जमिनीवर आली आहे. साडेचार वर्षे
मित्रपक्षांची फरफट केल्याने निवडणुकीच्या तोंडावर मित्रपक्ष दूर जात आहेत. तर
शिवसेनेसारखा मोठा व जुना मित्रपक्ष थेट पंतप्रधानांवर जोरदार हल्ला चढवित असताना
भाजपाकडून त्याचे उत्तर न देता मवाळ धोरण स्वीकारत आहे. भाजपला सेनेशिवाय
महाराष्ट्रात गत्यंतर नसल्याने सेनेनेही भापजला कोंडीत पकडण्याचे निश्चित केले
आहे.
सन 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपने
शिवसेनेशी युती करुन 48 पैकी 42 जागांवर विजय मिळविला. केंद्रात बहुमत
मिळाल्याने भाजपने मित्र पक्षाला दुय्यम स्थान देणे सुरु केले. त्यानंतर
महाराष्ट्रात सेनेसोबत युती न करता स्वबळावर निवडणूक लढवून मुख्यमंत्रीपद मिळविले.
राज्यातही सेनेची फरफट केली. त्यामुळे दुखावलेल्या सेनेने भाजपावर सत्तेत राहूनही वार
करणे सुरुच ठेवले.
नुकताच मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणा विधानसभेचे
निवडणूक निकाल लागले. यात भाजपला पाचही राज्यात अपयश आले. एवढेच नव्हे तर राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसारखे भाजपचे
बालेकिल्ले उद्ध्वस्त झाले. त्यामुळे भाजपची नेतेमंडळी हवालदिल झाली आहे. अहंकार
आणि एकाधिकारशाही मिरविणार्या मोदी-शहा जोडीचे डोके ठिकाणावर आले. भाजपने गेले
साडेचार वर्षात सेनेचा वारंवार अपमान करण्याची एकही संधी सोडली नाही. बाळासाहेब
ठाकरे यांच्या कार्यकाळात मातोश्रीचा जो दबदबा होता. तो संपुष्टात आणण्याचे काम
भाजपाकडून झाले. पण नुकत्याच झालेल्या निवडणूक निकालानंतर सेनेला भाजपची कोंडी
करण्याची संधी मिळाली. गतवर्षी सेनेने स्वबळाचा नारा दिल्यापासून खडबडून जागे
झालेल्या भाजपने सेनेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न सुरु केला. पण सेना नेतृत्वाकडून
भाजपला प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे भाजपच्ीया गोटात अस्वस्थता पसरलेली आहे.
कारण भाजपला लोकसभेसाठी कोणत्याही परिस्थितीत सेनेशी जुळवून घेऊन केंद्रात सत्ता
आणावयाची आहे. सेनेशी जुळवून घेतले नाही तर केंद्रात सत्ता येणे अशक्य आहे. हे
भाजप नेतृत्वाला कळून चुकले आहे. त्यामुळे भाजपचे वाचाळ नेते सेनेने कितीही टीका केली तरी ते सहन
करत भाजपचे नेतृत्व मवाळ झाले आहे.
सेनेच्या टार्गेटवर पंतप्रधान मोदी
शिवसेनेने गेल्या साडेचार वर्षात भाजपच्ीया चुकीच्या धोरणावर टीका
करण्याची एकही संधी सोडली नाही. सरकारच्या नोटाबंदीचा निर्णय, जीएसटीचा निर्णय असो त्यावर सडकून
टीका केली तर आरबीआय, सीबीआय आणि
सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी घेतलेली पत्रकार परिषद या मुद्यावरुनही
सरकारला विशेषत: पंतप्रधान मेदींना टार्गेट केले. एवढेच नव्हे तर काँग्रेसचे
अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेलचे प्रकरण उचलून धरले. गांधी आणि पंतप्रधान मोदी, उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावरही
थेट आरोप केले. राफेल प्रकरणी सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंढरपुरातील
महासभेत पंतप्रधानांवर चौकीदार चोर संबोधले. पंतप्रधानांवर सेनेकडून थेट हल्ले
होत असतानाही भाजपची मंडळी मात्र सेनेच्या हल्ल्याने घायाळ होऊन गप्प बसली आहे.