संशयास्पदरित्या वकिलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : बीड बायपास रोडवर गांधेली फाट्याजवळ हायकोर्टातील एका वकिलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या मांडीत शस्त्राचा घाव असल्याने खून झाल्याचा दाट संशय आहे ही घटना बुधवारी (दि. १५) रात्री ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मिथुन भास्कर (४९, रा. आनंद नगर, बीड बायपास) असे मृत वकिलाचे नाव असल्याची माहिती एमआयडीसी सिडको ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी दिली.
बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक भारत पाचोळे, जगन्नाथ मेनकुदळे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी वकिलांच्या मांडीच्या भागातून प्रचंड रक्तस्त्राव झालेले दिसून आले. त्यांनी तत्काळ त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. घटनास्थळी एसीपी भागीरथी पवार, मनोज पगारे, गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी फॉरेन्सिक टीम तसेच श्वान पथकास पाचारण करण्यात आले.
झुडुपात रक्ताचा सडा
भास्कर यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळून आला. तिथेच त्यांची मोपेड (एमएच -२०, जीएन-१६०८) देखील उभी होती. तिथून १५० मीटर अंतरावर झुडुपात रक्ताचा सडा पडलेला आढळला. या संपूर्ण मार्गावरदेखील त्यांचे रक्त आहे. त्यामुळे झुडपात त्यांच्यावर हल्ला झाल्यानंतर बचावासाठी ते मुख्य रस्त्याकडे धावले. मात्र तिथेच पडून राहिले, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.