बंगळुरू : आजकाल सगळीकडेच AI मुळे नोकऱ्यांवर गदा आली आहे. आधीच आयटीतील एका बड्या कंपनीने एकीकडे 12 हजार कर्मचाऱ्यांना एका झटक्यात नारळ दिल्याची बातमी समोर आली असतानाच आता एका दाम्पत्याने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली. AI मुळे नोकरी गेली आणि त्याच तणावातून पतीनं आयुष्य संपवलं. त्याचा धसका घेऊन पत्नीनंही आपलं आयुष्य संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
कुठे घडली घटना?
उत्तर बंगळुरूच्या कोथानूर परिसरात एका आयटी दांपत्याने आपलं आयुष्य संपवलं. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडली.३२ वर्षीय आयटी इंजिनिअरने बेरोजगारीच्या नैराश्यातून गळफास घेतला, तर पतीचा विरह सहन न झाल्याने त्याच्या पत्नीनेही काही मिनिटांतच टोकाचं पाऊल उचललं. तिने इमारतीवरून उडी मारून आयुष्याचा शेवट केला.
भानू चंदर रेड्डी हा तरुण अमेरिकेत मोठ्या पगारावर नोकरीला होता. मात्र, गेल्या वर्षी AI मुळे झालेल्या कर्मचारी कपातीत त्याची नोकरी गेली. त्यानंतर हे दांपत्य भारतात परतलं आणि ८ महिन्यांपूर्वी बंगळुरूमध्ये स्थायिक झालं होतं. भानूची पत्नी शाझिया हिला आयबीएममध्ये नोकरी मिळाली होती, पण भानू मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून नोकरीसाठी वणवण भटकत होता.
त्या २० मिनिटांत काळजाचा थरार
बुधवारी सकाळी शाझिया हैदराबादवरून बंगळुरूला परतली. सकाळी ७:३० च्या सुमारास तिने पतीला फोन केला, पतीने बेडरूमचा दरवाजा उघडला नाही. शेवटी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने दरवाजा तोडला, भानूचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला. तिथे एक नोटीही सापडली. पतीचा मृतदेह पाहून शाझिया पूर्णपणे कोलमडली. पोलीस येण्यापूर्वीच अवघ्या २० मिनिटांत तिने कोणाचेही लक्ष नसताना १८ व्या मजल्याची गॅलरी गाठली
आणि तिथून खाली उडी मारली.
पोलिसांना मिळालेल्या सुसाईड नोटनुसार, भानू चंदर रेड्डी हा गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली होता. नोकरी सुटल्याचं दुःख, आर्थिक चणचण आणि त्यातच काही आरोग्याच्या तक्रारींमुळे तो खचला होता. नोकरी शोधूनही मिळत नसल्याने त्याचं नैराश्य वाढत गेलं होतं.