छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार , डोंगरावरून उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडीलही कोसळले; तिघांचाही मृत्यू

Foto
छत्रपती संभाजीनगर : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या ऐतिहासिक व धोकादायक खवड्या डोंगर परिसरात आज, शुक्रवारी ( दि. २१) दुपारी 1 वाजेच्या सुमारास काळजाचा थरकाप उडवणारी अत्यंत विदारक घटना घडली. कौटुंबिक वादातून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पोटच्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आई आणि वडील हे दोघेही मुलासोबत थेट खोल खदाणीत कोसळले. डोंगराच्या उंच कड्यावरून खाली असलेल्या महाकाय खडकांवर आदळल्याने देवळाई परिसरातील या एकाच कुटुंबातील तिघांचाही जागीच तडफडून दुर्दैवी अंत झाला. मृतांची ओळख अद्याप पटली नाही. या भयंकर घटनेने संपूर्ण छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसर सुन्न झाला आहे.

सकाळी १० वाजेपासून हायव्होल्टेज ड्रामा; ३ तास मनधरणी
तिसगावचे माजी सरपंच आणि प्रत्यक्षदर्शी संजय जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण सकाळी १०:०० वाजल्यापासूनच खवड्या डोंगराच्या अत्यंत टोकदार आणि धोकादायक कड्यावर उभा होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन, अग्निशामक दल आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सलग तीन तास त्याला खाली उतरवण्यासाठी विनवण्या केल्या जात होत्या. आई डोंगराच्या कड्यावरून हात जोडून मुलाला मागे फिरण्याची याचना करत होती, तर वडील खालून त्याला समजावत होते.

अग्निशामक दलाने जाळी धरली, पण तरुणाने दिशा बदलली
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अग्निशामक दलाच्या जवानांनी तरुणाला वाचवण्यासाठी डोंगराच्या पायथ्याशी सुरक्षेची मोठी जाळी (Safety Net) पकडून ठेवली होती. मात्र, डोंगराच्या कड्यावर उभा असलेला तरुण सातत्याने आपली दिशा बदलत होता. त्यामुळे त्याचे वडील देखील वर येऊन त्याला विनवणी करत होते. मात्र, दुपारी १ वाजेच्या सुमारास तरुणाने एका क्षणात खाली उडी घेतली. मुलाला कड्यावरून खाली कोसळताना पाहून जीवाच्या आकांताने त्याला पकडण्यासाठी धावलेल्या वडीलांचाही तोल गेला आणि ते दोघेही खोल खदाणीत कोसळले. तर हे भयंकर दृश्य पाहून आईने देखील त्या दोघांच्या पाठोपाठ उडी घेतली. 

खडकांवर आदळून जागीच मृत्यू; खवल्या डोंगर पुन्हा चर्चेत
डोंगराच्या खाली खोल दगडी खदान असल्याने तिघेही थेट महाकाय खडकांवर आदळले. शरीराला गंभीर दुखापती झाल्याने आणि डोक्याला मार लागल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तिघांचेही मृतदेह खदाणीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालय , घाटी येथे पाठवले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार ही घटना तीव्र कौटुंबिक वादातून घडल्याचे समजते. खवल्या डोंगर परिसरात यापूर्वीही अनेक आत्महत्या व अपघातांच्या घटना घडल्या असून, या ठिकाणी सुरक्षा कठडे उभारण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे.