औरंगाबाद : औरंगाबाद मतदारसंघात यावेळी चौरंगी लढत होत आहे. शिवसेना-भाजपा युतीकडून विद्यमान खा. चंद्रकांत खैरे, काँग्रेस आघाडीकडून आ. सुभाष झांबड, शिवस्वराज्य बहुजन पक्षातर्फे हर्षवर्धन जाधव व वंचित आघाडीकडून एमआयएमचे आ. इम्तियाज जलील नशीब आजमावत आहेत. चारही उमेदवार प्रबळ असल्याने तसेच कोणकोणाची मते खाणार यावर निवडणुकीचे चित्र सध्या दिसत असले तरी प्रत्यक्ष मात्र शेवटच्या दोन दिवसांत कोणता उमेदवार जातीधर्माचे राजकारण करतो यावरही उमेदवारांचा विजय ठरणार आहे. मतदारसंघातील प्रचाराचा जोर जाती-धर्मावर येऊन ठेपल्याने आता कुणाचे गणित बिघडते अन् कोण बाजी मारतो याचा अंदाजच येईनासा झाला आहे. आतापर्यंत काहीसा रेगाळलेल्या प्रचाराला येत्या दोन दिवसांत जोर चढणार आहे. या दोन दिवसांतच सर्वच पक्षांच्या स्टार प्रचाराकांच्या सभांनी वातावरण ढवळून निघणार आहे. त्यामुळे चौरंगी लढतीत कोण बाजी मारणार हे 23 मे रोजीच कळणार आहे.