विद्यापीठाच्या परीक्षेत पेपरफुटीचा धक्कादायक प्रकार बी. कॉमचा पेपर व्हॉट्सअॅपवर

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षांदरम्यान पेपरफुटीचा गंभीर प्रकार समोर आल्याने संपूर्ण शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. ७ एप्रिलपासून सुरू असलेल्या पदवी परीक्षांमध्ये शनिवारी (दि.११) वाणिज्य शाखेतील 'डायरेक्ट टॅक्स' या ८० गुणांच्या महत्त्वाच्या पेपरचा प्रश्नसंच परीक्षा सुरू होण्याच्या अनेक तास आधीच व्हॉट्सअॅपवर विक्रीसाठी उपलब्ध झाल्याचे समोर आले. दुपारी २ वाजता होणाऱ्या पेपरची पीडीएफ फाइल विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर थेट पोहोचल्याने परीक्षेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकाराचा भांडाफोड़ नाट्यमय पद्धतीने झाला. खोकडपुरा येथील मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन मॅनेजमेंट स्टडीज अॅण्ड रिसर्च या महाविद्यालयाचे संचालक डॉ. सतीश सुराणा यांच्या लक्षात दोन दिवसांपूर्वीच संशयास्पद हालचाली
आल्या होत्या. परीक्षा केंद्राबाहेर काही विद्यार्थी गुपचूप व्यवहार करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ११ एप्रिल रोजी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच परीक्षा केंद्राबाहेर जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याच वेळी एका विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये दुपारच्या पेपरची पीडीएफ फाइल आढळून आल्याने संपूर्ण प्रकार उघड झाला. सुराणा यांनी संबंधित विद्यार्थ्यांचा मोबाइल तपासला असता एक संघटित रॅकेट कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले. व्हॉट्सअॅप चॅटमध्ये सकाळी १० वाजल्यापासून पेपर मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. केवळ १४० रुपयांच्या मोबदल्यात पेपर विकला जात असल्याचे दिसून आले. यासाठी समोरील व्यक्तीने क्यूआर कोड पाठवून ऑनलाइन पैसे मागवले होते. विद्यार्थ्याने पैसे भरताच दुपारी १.१० वाजता त्याला पेपरची पीडीएफ फाइल पाठवण्यात आली. ही केवळ एक साधी चूक नसून, व्यवस्थित आखलेल्या साखळीमार्फत पेपरफुटीचा उद्योग चालत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.