झाड वाचवायला गेलेल्या मुकुंदवाडीतील दुकानदाराचा जेसीबीच्या धडकेत मृत्यू

Foto
कंत्राटदार जेसीबी चालकाचा निष्काळजीपणा बेतला जिवावर
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : मुकुंदवाडीतील स्वराजनगर भागात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान कंत्राटदार आणि जेसीबी चालकाच्या निष्काळजीपणामुळे ५५ वर्षीय व्यक्तीला जीव गमवावा लागला. रस्त्याचे काम सुरू असताना तिथे असलेले झाड तुटत असल्याचे चालकाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी गेलेले किराणा दुकानदार संजय पंढरीनाथ चौधरी यांना जेसीबीच्या फावड्याचा जोरदार फटका बसला. यात गंभीर जखमी झालेल्या चौधरी यांचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना रविवारी (दि. १२) दुपारी १२.३० वाजता घडली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात जेसीबी चालक अनिल लक्ष्मण राठोड (४६, रा. कामगार गल्ली, चिकलठाणा) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृताचा मुलगा दत्ता चौधरी यांनी फिर्याद दिली. रविवारी दुपारी त्यांच्या दुकानासमोर रस्त्याचे काम सुरू होते. यावेळी जेसीबीद्वारे खोदकाम सुरू असताना बाजूला असलेले झाड तुटत होते. हे पाहिल्यावर संजय चौधरी ते झाड तुटू नये, हे सांगण्यासाठी जेसीबी चालकाकडे गेले. मात्र, मशीनच्या गोंगाटात चालकाला चौधरी यांचा आवाज ऐकू आला नाही. याच वेळी चालकाने जेसीबी वळवल्याने त्याचे लोखंडी फावडे संजय यांच्या डाव्या पायाला लागले. पायाला मोठी जखम होऊन प्रचंड रक्तस्त्राव झाला. संजय चौधरी यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुपारी १:५५ च्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions