श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी सलग ४८ तास खुले

Foto
पहाटेपासून पाच तासांची रांग; वेरूळ घाटात वाहतूक कोंडी

खुलताबाद, (प्रतिनिधी) वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री घृष्णेश्वर मंदिरात महाशिवरात्री पर्वकाळात रविवारी भाविकांनी प्रचंड गर्दी केली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. हर हर महादेवच्या जयघोषात भाविकांनी गाभाऱ्यात प्रवेश करून घृष्णेश्वराच्या चरणी माथा टेकवत दर्शन घेतले. 

महाशिवरात्री निमित्त राज्यासह देशातील विविध भागांतून हजारो भाविक वेरूळ नगरीत दाखल झाले होते. त्यामुळे दर्शनासाठी किमान चार ते पाच तासांचा कालावधी लागत होता. प्रदोष, महाशिवरात्री आणि सोमवारीचा शिवभक्तीचा योग साधत मंदिर प्रशासनाने यंदा सलग ४८ तास मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेतला होता. 

ग्रामस्थांमध्ये नाराजी वेरूळ गाव व परिसरातील भाविकांसाठी पहाटे चार ते आठ या वेळेत विशेष दर्शन व्यवस्था करण्यात आली होती. मात्र वाढलेल्या गर्दीमुळे ही व्यवस्था कोलमडली. स्थानिक ग्रामस्थांना दीर्घकाळ रांगेत थांबावे लागल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.

उपवासाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मंदिर परिसरात भाविकांसाठी उपवासाचे लाडू, साबुदाणा, केळी यांचे वाटप करण्यात आले. तसेच लिंबू शरबत व पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती. स्वयंसेवक, प्रशासनाकडून गर्दी नियोजनासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.

▶ वेरूळ घाटात वाहतूक ठप्प : 
महाशिवरात्रीनिमित्त भाविकांच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होती. लेणी ते भोसले चौक हा परिसर ङ्गनो व्हेईकल झोनफघोषित करण्यात आला होता. तरीही छत्रपती संभाजीनगरखुलताबाद मार्गे येणाऱ्या वाहनांमुळे वेरूळ घाटात वारंवार वाहतूक कोंडी झाली. काही काळ रहदारी पूर्णपणे ठप्प झाली होती.

▶ पालखी सोहळा उत्साहात  : 
दरवर्षीप्रमाणे घृष्णेश्वर मंदिरातून देवाची पालखी काढण्यात आली. शिवालय तीर्थकुंडावर विधिवत पूजा करून पालखी पुन्हा मंदिरात परतली. या सोहळ्यातही भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.