मांजरी येथे श्री मुकुंदादेवी माता नवरात्र कीर्तन महोत्सव

Foto
▶ ज्ञानेश्वरी पारायण, हरिकीर्तन, हरिजागराचे आयोजन
▶ २० ऑक्टोबर रोजी काल्याच्या कीर्तनाने होणार सांगता

गंगापूर, (प्रतिनिधी) तालुक्यातील मांजरी येथील श्रीक्षेत्र श्री मुकुंदादेवी माता मंदिरात रविवार, दि. ११ ऑक्टोबरपासून नवरात्र कीर्तन महोत्सव व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्याची सांगता मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी होणार आहे. या कालावधीत दररोज काकडा भजन, विष्णुसहस्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, संगीत भजन, हरिपाठ, कीर्तन व हरिजागर असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.

ह.भ.प. भास्करगिरी महाराज, ह.भ.प. रामगिरी महाराज व ह.भ.प. रामभाऊ महाराज राऊत यांच्या आशीर्वादाने,
तसेच ह.भ.प. कैलासगिरी महाराज, ह.भ.प. प्रकाशानंदगिरी महाराज, १००८ महामंडलेश्वर स्वामी वोणेचरानंदगिरी महाराज व ह.भ.प. पद्माकर महाराज पाटोळे यांच्या प्रेरणेने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

ज्ञानेश्वरी कंठस्थ चंद्रकांत महाराज मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटे ४ ते ६ या वेळेत काकडा भजन, विष्णुसहस्रनाम व ज्ञानेश्वरी पारायणासह विविध धार्मिक कार्यक्रम होतील. शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता ह.भ.प. महंत रामगिरी महाराज यांचे हरिकीर्तन होणार आहे.

तसेच दररोज सायंकाळी ४ ते ६ या वेळेत हरिपाठ, रात्री ७ ते ९ या वेळेत कीर्तन व हरिजागराचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात ह.भ.प. कोमलताई महाराज कुन्हाडे, ह.भ.प. साध्वी वैष्णवी सरस्वती, ह.भ.प. मोनिकाताई महाराज येवले, ह.भ.प. सुवर्णामाई महाराज जमधडे, ह.भ.प. कविताताई महाराज साबळे तसेच सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी ह.भ.प. संजीवनीताई महाराज गडाख यांची कीर्तने होणार आहेत. 

मंगळवार, (दि. २०) रोजी सकाळी भागवताचार्य ह. भ. प. रुक्मिणीताई महाराज हावरे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता होईल. यानिमित्त माता प्रतिमेची मिरवणूकही काढण्यात येणार आहे. मांजरी, माहुली, सावखेडा, कान्होबावाडी तसेच पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 

या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी अध्यक्ष अंजली कसाने, गटनेते संतोष अंबिलवादे, बाळासाहेब रत्नपारखी, मुकुंद कसाने, कृष्णा साळुंके, चंद्रकांत मुळे, शिवाजी लांडे, मनोज कुलकर्णी, मनोज साळुंके, बाळू सोनवणे, नामदेव मिसाळ, सुनील कसाने यांच्यासह ग्रामस्थ व भजनी मंडळ परिश्रम घेत आहेत.