श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात सर्प जनजागृती

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) :  येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात नागपंचमी सणाचे औचित्य साधून सर्प जनजागृती अभियान राबवले. सर्पमित्र रामेश्वर गाडेकर यांनी सापांचे प्रकार, निसर्ग समतोल राखण्यासाठी सापांची आवश्यकता आणि त्यांच्या जीवनाविषयी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांमध्ये सापांबद्दल असलेली भीती आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सर्प जागृती व निसर्ग संवर्धन हा उपक्रम राबवण्यात आला. 

प्रमुख पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापक निशांत मस्के व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गजानन डमाळे यांनी केले. या अभियानात विषारी साप कसा ओळखायचा, सापांचे प्रकार, सापांच्या विविध प्रजाती, साप चावल्यावर करावयाचे प्रथोमचार, साप समोर दिसला तर काय करावे याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. विषारी, निम विषारी व बिनविषारी सापाबद्दल माहिती सांगून रसेल, घोणस, नाग, मण्यार आणि फुरसे या विषारी सापांची लक्षणे चित्रफितीद्वारे समजावून सांगितली. 

साप हे शेतकऱ्यांचे शत्रू नसून मित्र आहेत तसेच ते उंदरांची संख्या नियंत्रणात ठेवतात, हे पटवून दिले. या सोबत सापांचे पर्यावरणातील महत्व आणि संरक्षणाबद्दल याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. सापांना न मारता, जखमी पशुपक्षी दिसल्यास त्यांच्यावर उपचार करून त्यांना मदत करण्याचे आवाहन सर्पमित्र रामेश्वर गाडेकर यांनी केले. या जनजागृती अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये सापांविषयीचा गैरसमज दूर होऊन, जागरूकता वाढेल, अशी अपेक्षा मुख्याध्यापक निशांत मस्के यांनी व्यक्त केली. मुलांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवत सापांविषयी अनेक प्रश्न विचारले आणि निसर्गातील अन्नसाखळीचे महत्त्व समजून घेतले.

सूत्रसंचालन रमेश सोनवणे यांनी केले तर आभार कडुबा गीते यांनी मानले. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील शिक्षक भिकन आगारे, लक्ष्मण कोलोड, सुनील तांबे, रमेश परदेशी, अंगद काळे, भास्कर सागरे, गणेश चव्हाण, अरविंद सोनवणे, अमोल ताटू, गजानन दौड, डॉ. रमेश काळे, पंकज सावंत, संगीता तायडे, संगीता काळे, नम्रता वडमारे, हर्षदा सनान्से, रमेश सपकाळ, शैलेश मोरे यांनी परिश्रम घेतले.