श्रीक्षेत्र देवगड येथे गुरुवारपासून श्रीमद भागवत कथा

Foto
कथेची जय्यत तयारी, राधाकृष्ण महाराज यांचे कथावाचन

गंगापूर, (प्रतिनिधी) : त्रैवार्षिक पुरुषोत्तम मासानिमित्त नेवासा तालुक्यातील भू लोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या श्री गुरूदेव दत्तपीठ क्षेत्र देवगड येथे राजस्थान जोधपूर येथील गोवत्स राधाकृष्णजी महाराज यांच्या वाणीतून गुरुवार दि. २१ मे पासून श्रीमद भागवत कथा सोहळा सुरू होत आहे. 

राष्ट्रसंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या नेतृत्वात होणाऱ्या श्रीमद भागवत कथा सोहळ्याच्या निमित्ताने किर्तन महोत्सवाचे ही आयोजन
करण्यात आले असून या सोहळ्याची जय्यत तयारी देवगड येथे सुरू आहे. सकाळी ९ ते १२ यावेळेत श्रीमद भागवत कथा होणार असून दुपारच्या सत्रात ३.३० ते ५ यावेळेत किर्तन महोत्सव साजरा होत आहे. 

यामध्ये देवगडचे विद्यार्थी गणेश महाराज तनपुरे, खलाल पिंपरी येथील शशिकांत महाराज कोरेकर, बहिरवाडी येथील रामनाथ महाराज पवार, लक्ष्मण महाराज नांगरे, आळंदी येथील सुदर्शन महाराज देशमुख यांची किर्तने होणार आहे.

 बुधवार दि. २७ मे रोजी दिंडी मिरवणूक व श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा यांचा पालखी सोहळा साजरा होणार असून गुरुवार दि. २८ मे रोजी राष्ट्रसंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या सकाळी ८ ते १० या वेळेत होणाऱ्या काल्याच्या किर्तनाने श्रीमद भागवत कथा सोहळा व किर्तन महोत्सवाची सांगता होणार आहे.