पावसामुळे वायू प्रदूषणात लक्षणीय घट

Foto
हवेतील गुणवत्ता सुधारली; धूलिकणही झाले कमी
उज्ज्वला साळुंके
छत्रपती संभाजीनगर शहरात काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे उष्णतेपासून दिलासा मिळालाच, पण शहरातील वाढलेल्या वायू प्रदूषणावरही मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळाल्याचे समोर आले आहे. उन्हाळ्यात धुळीचे प्रमाण, वाहनांमधून होणारे प्रदूषण आणि कोरड्या वातावरणामुळे शहरातील हवेची गुणवत्ता खालावली होती. मात्र, पावसाच्या सरींनी वातावरणातील धूलिकण अक्षरशः धुऊन काढल्याने प्रदूषणात लक्षणीय घट झाली आहे, असे वसुंधरा परीक्षण व संशोधन केंद्र, विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश पाटील आणि प्रा. रेखा तिवारी
यांनी दैनिक सांजवार्ताशी बोलताना स्पष्ट केले.
उन्हाळ्याच्या दिवसांत शहरातील हवेतील धूलिकणांची पातळी सातत्याने निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त नोंदविण्यात आली होती. प्रदूषणामुळे सुरक्षित मर्यादा १०० मायक्रोग्रॅम पर क्विबिक मीटरपर्यंत आहे. मात्र,
यंदाच्या उन्हाळ्यात ही पातळी ११० ते १५० मायक्रोग्रॅम पर क्विबिक मीटरपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे नागरिकांना उष्णतेबरोबरच प्रदूषणाच्या समस्यांनाही सामोरे जावे लागले होते. शहराचा एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) देखील उन्हाळ्यात सुमारे ११० पर्यंत नोंदविला गेला होता. ही पातळी नागरिकांसाठी चिंताजनक मानली जाते. पावसाचे पाणी वातावरणातील धूळ, धूर आणि इतर सूक्ष्म प्रदूषक कण जमिनीवर आणते. त्यामुळे हवेमधील प्रदूषकांचे प्रमाण कमी होते आणि हवा अधिक स्वच्छ व शुद्ध बनते. त्याचबरोबर वातावरणातील आर्द्रता वाढल्याने धूळ उडण्याचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे प्रदूषण कमी झाले आहे.
दरवर्षी पावसाळ्यात पातळी ५६ ते ६७ पर्यंत
उन्हाळ्यानंतर झालेल्या पावसानंतर परिस्थितीत सकारात्मक बदल दिसून आला आहे. पावसामुळे वातावरणातील धुळीकण खाली बसल्याने शहरातील प्रदूषणात मोठी घट होते. दरवर्षी पावसाळ्यात प्रदूषण पातळी ५६ ते ६७ मायक्रोग्रॅम पर क्विबिक मीटरपर्यंत नोंदविण्यात येते. ही पातळी पावसाळ्यातील सामान्य आणि तुलनेने सुरक्षित मानली जाते.
सलग पाऊस पडला तर २० ते २५ पर्यंत येते रीडिंग
दरवर्षी पावसाळ्यात शहरातील प्रदूषण कमी होते. त्यामुळे दिलासा मिळतो. मात्र, जर सलग पंधरा दिवस चांगला पाऊस झाला, तर वातावरण आणखी स्वच्छ होते आणि प्रदूषणाची पातळी २० ते २५ मायक्रोग्रॅम पर क्विबिक मीटरपर्यंत नोंदविले जाते. अशा परिस्थितीत हवेची गुणवत्ता अत्यंत चांगली मानली जाते.