नवी दिल्ली : जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि पश्चिम आशियातील तणावानंतर भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी एक अत्यंत सकारात्मक बातमी समोर आली आहे. भारताच्या परकीय चलनसाठ्यात पुन्हा वाढ नोंदवली गेली आहे. ३ जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलनसाठा ७.२६ अब्ज डॉलरने वाढून ६७४.१९ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी ही माहिती जाहीर केली.
दरम्यान, मागील आठवड्यात परकीय चलनसाठ्यात ५.६५ अब्ज डॉलरची घट होऊन तो ६६६.९३ अब्ज डॉलरवर आला होता. तसेच, २७ फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात (पश्चिम आशियातील संघर्ष तीव्र होण्यापूर्वी) भारताचा परकीय चलन साठा ७२८.४९ अब्ज डॉलर्सच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला होता. त्यानंतर यात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत.
पश्चिम आशियातील तणावामुळे रुपयावर दबाव
अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्यानंतर भारतीय रुपयावर मोठा दबाव निर्माण झाला होता. रुपयातील घसरण रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेला परकीय चलन बाजारात डॉलरची विक्री करून हस्तक्षेप करावा लागला. त्यामुळे सलग काही आठवड्यांत परकीय चलनसाठ्यात घट झाली होती. मात्र, आता त्यात वाढ होताना दिसत आहे.
आरबीआयच्या आकडेवारीनुसार, ३ जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलनसाठ्याचा प्रमुख घटक असलेल्या परकीय चलन मालमत्तेत ४.५१ अब्ज डॉलरची वाढ झाली. त्यामुळे हा साठा ५४५.५७८ अब्ज डॉलरवर पोहोचला. डॉलरच्या तुलनेत मोजल्या जाणार्या या मालमत्तेमध्ये युरो, पाउंड, येन यांसारख्या इतर प्रमुख चलनांच्या मूल्यातील चढ-उताराचाही परिणाम होत असतो.
सोन्याच्या साठ्यात २.६७ अब्ज डॉलरची भर
परकीय चलनासोबतच भारताच्या सोन्याच्या साठ्यातही मोठी वाढ झाली आहे. आरबीआयच्या माहितीनुसार, समीक्षाधीन आठवड्यात देशातील सोन्याच्या साठ्याचे मूल्य २.६७ अब्ज डॉलर्सनी वाढून १०५.२० अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे. तसेच, विशेष रेखांकन अधिकार () ६.५ कोटी डॉलर्सनी वाढून १८.६२ अब्ज डॉलर्स झाले आहेत. याशिवाय, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे असलेला भारताचा राखीव निधीही १.५ कोटी डॉलर्सनी वाढून ४.७९ अब्ज डॉलर्स झाला आहे.
इथेनॉल मिश्रणामुळे १.९० लाख कोटी रुपयांची परकीय चलन बचत
दरम्यान, केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाच्या कार्यक्रमामुळे देशाला मोठा आर्थिक फायदा झाल्याचे सांगितले आहे. अन्न मंत्रालयाचे संयुक्त सचिव अश्विनी श्रीवास्तव यांनी ग्रेन इथेनॉल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ()च्या परिषदेत सांगितले की, आर्थिक वर्ष २०१४-१५ ते २०२६ या कालावधीत पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणामुळे १.९० लाख कोटी रुपयांहून अधिक परकीय चलनाची बचत झाली आहे.
या काळात ३१० लाख टनांहून अधिक कच्च्या तेलाच्या आयातीची गरज कमी झाली असून, त्यामुळे परकीय चलनाची मोठ्या प्रमाणावर बचत झाली आहे. याशिवाय या योजनेमुळे ऊस उद्योगाला चालना मिळाली असून शेतकर्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे.
बाजारावर आरबीआयची सतत नजर
भारतीय रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे की, परकीय चलन बाजारातील घडामोडींवर तिची सातत्याने नजर असून आवश्यकतेनुसार बाजारात हस्तक्षेप केला जातो. यामागचा उद्देश रुपयामध्ये होणारी अतिप्रमाणातील अस्थिरता रोखणे आणि बाजारातील स्थिरता कायम ठेवणे हा आहे. तथापि, आरबीआय कोणताही निश्चित विनिमय दर कायम ठेवण्याचे लक्ष्य ठेवून काम करत नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.