किशनचंद तनवाणींवर देणार मोठी जबाबदारी?
शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्त्वात लवकरच बदल होणार आहे. जिल्हाप्रमुख आणि महानगरप्रमुख या पदावर नवीन कार्यकर्त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. माजी आमदार किशनचंद तनवाणी यांना पक्ष संघटनेत महत्त्वाची जबाबदारी देण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला आहे. सेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तनवाणी यांच्यावर लवकरच मोठी जबाबदारी सोपविणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अलीकडे उघडपणे पक्षांतर्गत वाद प्रसिद्धी माध्यमांसमोर येत आहेत. ही बाब पक्षश्रेष्ठींना व शिवसैनिकांना न आवडणारी आहे. तसेच महानगरपालिकेची निवडणूक ही लवकरच होणार आहे. पक्ष संघटन वाढावे. मनपावर शिेवसेनेचा भगवा फडकावा या दृष्टीने पक्ष नेतृत्त्वात बदल केले जाणार आहेत. तसा निर्णय सेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झाला आहे. सध्या तीन मतदार संघात सेनेचे तीन शहराध्यक्ष व या तिन्ही मतदार संघावर महानगरप्रमुख नियुक्त केलेले आहेत. सध्या महानगरप्रमुख आ. प्रदीप जैस्वाल आहेत. ते मध्य मतदार संघातून आमदार म्हणून निवडूनआलेले आहेत. त्यांच्याकडे आमदारकी असल्याने महानगरप्रमुखपद अन्य कार्यकर्त्यास देऊन पक्ष संघटना वाढविण्याचा श्रेष्ठींचा विचार आहे. तसेच जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे बर्याच काळापासून जिल्हाप्रमुख पदावर कार्यरत आहेत. तेही आमदार झाले आहेत. पक्ष संघटन वाढविण्यासाठी जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी अन्य शिवसैनिकाला देण्याचा विचार झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
तनवाणी होणार सक्रीय
किशनचंद तनवाणी हे यापूर्वी 1996 ते 2000 सालापर्यंत शहराध्यक्ष होते. गेली पाच वर्षे ते भाजपामध्ये होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. सध्या त्यांच्याकडे पक्षाचे कोणतेही पद नाही. त्यामुळे त्यांना आता नवीन जबाबदारी देणार असल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून कळते.