कोलकाता : राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी येत्या १६ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात महायुतीकडून सहा जागांवर उमेदवार दिले जाणार आहेत, मात्र महाविकास आघाडीचं एका जागेवरील उमेदवारावर एकमत होत नाहीये. अशातच पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने वरिष्ठ वकील मेनका गुरुस्वामी यांना उमेदवारी दिली आहे. त्या एलजीबीटी समुदायाच्या पहिल्या खासदार ठरण्याची शक्यता आहे. गायक आणि मंत्री बाबुल सुप्रिया, अभिनेत्री कोएल मलिक आणि माजी डीजीपी कुमार या तिघांनाही तृणमूलने रिंगणात उतरवलं आहे.
आम्ही उमेदवारांचे मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. ते तृणमूल काँग्रेसच्या लवचिक विचारांचा वारसा जपतील, प्रत्येक भारतीयाचे हक्क आणि प्रतिष्ठा जपण्यासाठीची त्यांची अटळ वचनबद्धता कायम राखतील अशी ग्वाही तृणमूल काँग्रेस पक्षाने एक्स पोस्टमधून दिली. उल्लेखनीय म्हणजे, संसदेच्या वरिष्ठ सभागृहात निवडून आल्यास मेनका गुरुस्वामी या भारतातील पहिल्या उघडपणे एलजीबीटीक्यू समुदायाचे प्रतिनिधित्व करणार्या संसद सदस्य बनू शकतात.
मेनका गुरुस्वामी कोण आहेत?
मेनका गुरुस्वामी या सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील आहेत. २०१८ मध्ये भारतीय दंड संहितेतील कलम ३७७ रद्द झाल्यानंतर भारतात समलैंगिकतेला गुन्हेगारीमुक्त करण्यात आले, त्या ऐतिहासिक संवैधानिक खटल्यात युक्तिवाद करणार्या वकिलांपैकी त्या एक होत्या.
१९९७ मध्ये मेनका यांनी भारताचे माजी अॅटर्नी जनरल अशोक देसाई यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. देसाईंना त्या आपले मार्गदर्शक मानतात. किरण मनराल यांच्या ङ्गङ्घरायझिंग: ३० महिला हू चेंज्ड इंडियाङ्घङ्घ मधील माहितीनुसार त्या काळात मेनका यांनी अनेक महत्त्वाचे खटले आणि संवैधानिक बाबींवर काम केले.
सुमारे दीड वर्षानंतर त्या उच्च शिक्षणासाठी ऑक्सफर्डला गेल्या. २००१ मध्ये ऑक्सफर्डमधून बीसीएल आणि हार्वर्डमधून एलएलएम पूर्ण केल्यानंतर त्यांनी न्यू यॉर्कमधील डेव्हिस पोल्क आणि वॉर्डवेल येथे काही काळ सहयोगी म्हणून काम केले. नंतर त्या भारतात परतल्या आणि नवी दिल्लीत स्थायिक झाल्या.
महत्त्वाचे सन्मान प्राप्त
२०१९ च्या फॉरेन पॉलिसी मासिकाच्या सर्वात प्रभावशाली १०० जागतिक विचारवंतांच्या यादीत त्यांचा समावेश होता. मेनका आपल्या जोडीदार अरुंधती काटजू यांच्यासह टाइम मासिकाच्या २०१९ च्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समाविष्ट होत्या. उल्लेखनीय बाब ही की मेनका गुरुस्वामी यांचे चित्र ऑक्सफर्ड विद्यापीठातील रोड्स हाऊसमधील मिलनर हॉलमध्ये प्रदर्शित केले आहे. हा सन्मान मिळवणार्या पहिल्या आणि एकमेव भारतीय, तर दुसर्याच महिला ठरल्या आहेत.