सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे ५. ७७ लाख रुपये परत
सिल्लोड, (प्रतिनिधी) येथील व्यावसायिक फिरोज खान बिसमिल्ला खान यांनी ऑगस्ट २०२४ मध्ये इंटरनेटवर झुडिओ फ्रँचायझीसाठी शोध घेतला होता. यावेळी दोन संशयित व्यक्तींनी स्वतःला कंपनीचे अधिकारी भासवून नोंदणी शुल्क, शोरूम बांधकाम आणि फर्निचरच्या नावाखाली फिरोज खान यांच्याकडून १३,९९,५०० रुपये आरटीजीएसद्वारे उकळले. मात्र, शोरूमच्या कामासाठी टाळाटाळ होत असल्याने फिरोज खान यांनी मुंबईतील मुख्य कार्यालयात चौकशी केली असता आपली फसवणूक झाल्याचे त्यांना समजले.
याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्याकडे तक्रार प्राप्त होताच सायबर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. गुन्ह्यात वापरलेली बँक खाती आणि मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांनी ५ लाख ७७ हजार रुपयांचा निधी गोठवला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ही रक्कम २५ फेब्रुवारी २०२६ रोजी फिरोज खान यांच्या खात्यात जमा करण्यात आली.
आपली कष्टाची रक्कम परत मिळाल्याने त्यांनी सायबर पथकाचे आभार मानले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सपोनि निशा बनसोड, विजयसिंग जोनवाल, कैलास कामठे, संतोष तांदळे, दत्ता तरटे, योगेश मोईम, गणेश घोरपडे, मुकेश वाघ, राजेश राठोड, शीतल खंडागळे, सविता जायभाये, रूपाली जाधव, अनिता पारधे व नंदा तायडे यांच्या पथकाने केली.












