सिल्लोड शहर बसस्थानकातील उपहारगृहाचा परवाना निलंबित

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : शहर बसस्थानकातील उपाहारगृहाचा परवाना निलंबित केला आहे. मागील आठवड्यात करण्यात आलेल्या कारवाईची माहिती प्रशासनाकडून गोपनीय ठेवण्यात आली होती.

अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात आलेल्या तपासणीत उपाहारगृहात अस्वच्छता असल्याचे आढळून आले होते. अन्न व औषध प्रशासनाने बसस्थानकावरील उपाहारगृहाची पाहणी केली असता परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळली. फरशीवर घाण, धूळ आणि माती साचलेली होती. तसेच खाद्यपदार्थांची रिकामी पाकिटे आढळून अस्ताव्यस्त पडलेली आली. विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या खाद्यपदार्थांच्या पॅकिंगवर खरेदीची नोंद नसल्याचेही तपासणीत आढळले. 

उपलब्ध खाद्यपदार्थांचा आवश्यक रेकॉर्ड उपाहारगृह चालकाला तपासणीवेळी सादर करता आला नाही. त्यामुळे नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले. या गंभीर त्रुटींमुळे उपाहारगृहाचा परवाना निलंबित करून उपाहारगृह बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

तसेच आवश्यक सुधारणा करण्यासाठी चालकाला १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. उपाहारगृह चालकाने स्वच्छता तसेच अन्य आवश्यक सुधारणा करून अन्नसुरक्षा नियमांचे पालन केल्यास परवाना पुन्हा देण्याबाबत विचार करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.